बांदा | राकेश परब :
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मडुरा दशक्रोशीत मात्र वीज वितरणचा भोंगळ कारभार सुरू आहे. घेराव, उपोषण छेडल्यानंतर भरीव आश्वासन दिली जातात त्याची प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे सेवेच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत असून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज वितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना सातार्डा उपविभागप्रमुख तथा मडुरा माजी उपसरपंच उल्हास परब यांनी वीज वितरणला दिला आहे.
श्री. परब म्हणाले की विजेच्या लपंडावासोबत विद्युत वाहिन्या तुटण्याचे अनेक प्रकार घडल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याची दखल घेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्युत पुरवठा अखंडीत ठेवत कोणताही अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा शिवसेना सातार्डा उपविभागप्रमुख उल्हास परब यांनी दिला आहे.
मडुरा-डिगवाडी परिसरात दोन वेळा विद्युत वाहिन्या तुटण्याचे प्रकार घडले. वाहिनी तुटल्यानंतर वीजपुरवठा खंडित होणे आवश्यक आहे मात्र तसे न झाल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. परंतु यावर विद्युत विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. विजेचा खेळखंडोबा मात्र सुरूच आहे. तर पाडलोस येथे वाहिन्यांवरील झुडपे तोडताना वाहिन्यांनी अचानक पेट घेतला असे प्रकार यापुढे होता कामा नये अशी तंबीच श्री. परब यांनी अधिकाऱ्यांना दिली. तसेच ग्राहकांच्या माथी भरमसाठ वीज बिले मारून नेमकं काय साध्य करायचे आहे, असा सवाल श्री.परब यांनी केला.
गतवर्षी गणेशोत्सवात मडुरा दशक्रोशीतील गावात वीज गुल होण्याचे प्रकार घडले मात्र यावर्षी तसे सहन केले जाणार नाही. त्यामुळे वेळीच दखल घेत विद्युत पुरवठा अखंडित ठेवण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी उल्हास परब यांनी केली आहे.