नाविन्यपूर्ण उपक्रमाचे होतेय सर्वत्र कौतुक..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मालवण तालुक्यातील ओझर विद्यामंदिर कांदळगाव या उपक्रमशील प्रशालेने इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल विषयाच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून भौगोलिक क्षेत्रांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी क्षेत्रभेटीचे आयोजन केले. क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत मसुरे चांदेरवाडी येथील नैसर्गिक धबधबा आणि तळाणी येथील खाजण सरोवर या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांनी या भौगोलिक क्षेत्रांविषयी माहिती मिळविली. या उपक्रमामुळे ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी बिनभिंतीच्या निसर्गातील शाळेत मुक्त शिक्षणाचा अनुभव घेतला.
भूभागावरी कठीण आणि मृदू खडकाच्या सानिध्यामुळे नैसर्गिक धबधब्याचे निर्मिती, खारकच्छ किंवा खाजण सरोवराची निर्मिती, खाजण सरोवराचे फायदे, कांदळवनाची आवश्यकता, जतन व संवर्धन याविषयी भूगोल शिक्षक प्रवीण पारकर आणि डी. डी जाधव यांनी सविस्तर माहिती दिली. या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पठारी भागावर वनभोजनाचाही आनंद लुटला. प्रशालेच्या वतीने अशा क्षेत्रभेटीचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. ओझर विद्यामंदिरच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पंचक्रोशीतील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.