नेरूरची सुकन्या कु. रूची संजय नेरूरकर सोनी मराठी चॅनेलवरील ‘बयो’ या मालिकेमध्ये साकारणार प्रमुख भुमिका..!!
नेरूर ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांकडून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव..!!
नेरूर । देवेंद्र गावडे
सोमवार । २५ जूलै २०२२
कलात्मक क्षेत्रात नेरूर गावाचं योगदान हा नेहमीच चर्चेचा विषय असतो.
मग ती लोककला असो किंवा आधुनिक नाट्य-सिनेसृष्टी. कलेच्या जवळपास प्रत्येक प्रांतात नेरूरवासियांची एक वेगळी छाप पडलेली आपल्याला दिसून येते.
आत्तापर्यंत ‘थोर’ कलावंतांसाठी जाणली जाणारी नेरूर ही देवभूमी इथून पूढे ‘बाल’ कलाकारांसाठी सुद्धा जाणली जाईल एवढं मात्र नक्की.
अर्थातच त्याला कारणही तसंच आहे..
नेरूर गावामधील हा कलात्मक वारसा पूढे नेतानाच कु. रूची संजय नेरूरकर हीची सोनी मराठी चॅनेलसारख्या लोकप्रिय चॅनेलवरील ‘बयो’ या मराठी मालिकेतील प्रमुख भुमिकेसाठी निवड होणे म्हणजे नेरूरच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेल्याचेच द्योतक आहे.
कु. रूचीचे वडील श्री. संजय नेरूरकर हे देखील एक प्रसिद्ध नाट्यअभिनेते आहेत. नेरूरमधील ॐशिवकृपा कला क्रिडा मंडळामधून त्यांनी रंगभूमीप्रती आपले योगदान सातत्याने दिलेले आहे, देत आहेत.
कु. रूचीला हे अभिनयाचं बाळकडू बालपणी तीच्या कुटूंबामधूनच मिळालं. त्यात मोठा भाऊ कु. दिनारचं पाठबळही तेवढंच मोलाचं.
तीच्यातील ही क्षमता जाणून तीला उत्तम मार्गदर्शन करून या हि-याला पैलू पाडण्याचं काम केलं ते स्वतः एक उत्तम अभिनेते, निवेदक असणारे नेरूर गावचेच सुपूत्र श्री. निलेश गुरव यांनी.
बालकलाकार म्हणून नेरूर गावाचं प्रतिनिधित्व करताना कु. रूचीला टेलिव्हिजन, सीने-नाट्यक्षेत्रात भरभरून यश प्राप्त व्हावं अशी भावना आज प्रत्येक नेरूरवासिय व्यक्त करताना दिसत आहे.
याचंच औचित्य साधून नेरूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने कु. रूची व तीच्या पालकांचा निवासस्थानी हृद्य सत्कार करून कु. रूचीच्या भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी नेरूर गावचे सरपंच शेखर गावडे, उपसरपंच समद मुजावर, ग्रामपंचायत सदस्या सौ. भक्ती घाडी, माजी उपसरपंच सुनिल गावडे, शिवसेना ओबीसी सेल विभाग प्रमुख प्रविण नेरूरकर, प्रसिद्ध रंगकर्मी-निवेदक निलेश गुरव, निलेश घाडी, विजय लाड, रोहिदास चव्हाण, प्रथमेश नेरूरकर, कु. रूचीचे आई-वडील व आजी त्याचबरोबर नेरूरमधील ज्येष्ठ ग्रामस्थव शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.