शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्याच्या एका टोकाला आणि कणकवली तालुक्याच्या सीमेला लागून चाफेड गाव वसलेला आहे. भौगोलिक रचना ही चारीबाजूने डोंगर दऱ्यात गाव वसलेला असल्यामुळे या गावाला फार पूर्वी “दडगवली” म्हणजे दडलेला गाव असे म्हणायचे. आज डिजिटल युगातही या गावात कुठल्याही भ्रमणध्वनीची रेंज नाही. गावठण मार्गे रस्त्याची पार दुरवस्था, अशा विविध मूलभूत समस्यांनी हा गाव ग्रस्त आहे. कुणी या गावाला वाली आहे का? असा सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत. पाण्याचा प्रश्न मिटला, पण रस्त्याचे काय? गेली कित्येक वर्षे या गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. त्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत असे. मात्र, गतवर्षी नळपाणी योजना झाल्याने हा प्रश्न मिटला आहे. गाव मार्गे भोगलेवाडी फाट्यापर्यंत च्या रस्त्याची सध्या भयानक अवस्था झाली आहे.
गावची शान दुर्गाचा गड दुर्लक्षित…
चाफेड गावची शान असलेला ऐतिहासिक दुर्गाचा गड आजही दुर्लक्षित राहिला आहे. या गडावर जायला साधी पायवाटही नाही. उन्हाळ्यात अनेक पर्यटक, दुर्ग भ्रमण करायला याठिकाणी भेटी देतात. चारही बाजूला तटबंदी, पूर्वेला प्रवेशद्वार, गडावर दोन मोठे हौद, घोड्यांच्या पागा, राजदरबारचा चिरेबंदी चौथरा असे अनेक ऐतिहासिक अवशेष याठिकाणी बघायला मिळतात. मात्र, या गडावर जाण्यासाठी कायमस्वरूपी पायवाट होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने संबंधित खात्याने याकडे लक्ष द्यावे, अशीही ग्रामस्थ मागणी करत आहेत.
मोबाईल सेवेची वानवा..
मोबाईल टॉवरची मागणी या गावातील ग्रामस्थ जोर धरत आहेत. कुठल्याही मोबाईलची सेवेची रेंज या गावात येत नाही. त्यामुळे ऑनलाईन अभ्यासासाठी मुलांना खूपच त्रास होत आहे. एकंदरीत या गावाचा गावठण भाग हा चारही बाजूने डोंगरदऱ्यात विखुरलेला असल्यामुळे अन्यत्र असलेल्या कुठल्याही मोबाईल टॉवरची रेंज याठिकाणी येत नाही. सध्या डिजिटल युगात चाफेड गाव खूपच मागे राहिला आहे. यामुळे गावात मोबाईल टॉवर उभारण्याची जोरदार मागणी होत आहे.
गावात स्वतंत्र वायरमन नाही…..
या गावाला स्वतंत्र वायरमन नसल्यामुळे पावसाळ्यात विद्युतपुरवठा खंडित झाल्यास ग्रामस्थांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. सध्या साळशी आणि चाफेड या दोन गावांसाठी वायरमन आहे. मात्र, चाफेड गावासाठी स्वतंत्र वायरमन मिळावा, अशी ग्रामस्थांची फार पूर्वीपासून मागणी आहे. स्वतंत्र तलाठी कार्यालय, आरोग्य उपकेंद्र, खासगी दवाखाना अशा विविध मूलभूत गैरसोयी या गावाला गेलो कित्येक वर्षे भेडसावत आहेत.
गावठण मार्गे भोगलेवाडी रस्त्याची दयनीय अवस्था….
चाफेड गावठण मार्गे भोगलेवाडी या सुमारे १.८०० किमी. या रस्त्याची सद्या खूपच बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून साधे चालणे देखील मुश्किल झाले आहे. आपण चंद्रावर आहोत की पृथ्वीवर हेच कळत नाही. एव्हढे भयानक खड्डे ठिकठिकाणी पडले आहेत. घाडीवाडी च्या पुढे भोगलेवाडी फाट्यापर्यंत तर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुचाकी स्वाराना आपली वाहने चालवताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोणत्याही क्षणी एस टी वाहतूक बंद पडण्याची वेळ आली आहे. एक महिन्यानंतर गणेशोस्तव सण तोंडावर आल्याने या कालावधीत एस टी सेवा सुरू राहील की नाही याची चिंता ग्रामस्थांना आतापासून लागली आहे.तरी संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी आग्रही मागणी ग्रामस्थ करीत आहेत.