बांदा | राकेश परब :
सुभद्राबाई शिक्षण निधी डोंबिवली यांच्या विद्यमाने आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या परिस्थिती दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक वर्ष २०२२ – २०२३ साठी शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ३०० हुन अधिक विद्यार्थी/विद्यार्थिनीना (३००० – १५०००) संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती केवळ रत्नागिरी/सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी असून दहावी उत्तीर्ण होऊन सरकार मान्य अशा कोणत्याही अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला मिळू शकते. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण भरलेली फी पावती, मागील वर्षाची गुणपत्रिका, कुटुंबाची शिधा पत्रिका, उत्पन्नाचा दाखला, शाळेच्या २ शिक्षकांची प्रमाणपत्रे आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड पीडीएफ फॉरमॅट मध्ये तयार असणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२२ असून अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच अर्जांची छाननी झाल्यावर प्राथमिक निवड झालेल्यांना मुलाखतीसाठी ई-मेल द्वारा बोलाविले जाईल. मुलाखतीनंतर अंतिम निवड करून शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना ई-मेलने तसे कळविले जाईल आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्ती / मदत जमा केली जाईल अशी माहिती कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी दिली आहे.
तरी जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. अधिक माहितीसाठी कोकण संस्थेच्या माणगाव ऑफिस येथे संपूर्ण कागदपत्रांसह भेट द्यावी किंवा subhadrabaishikshannidhi.com या संकेत स्थळावर जाऊन आपला अर्ज भरावा असे आवाहन संस्थेने केले आहे.