वैभववाडी | नवलराज काळे :
पद्मश्री डॉ.खा.विकास महात्मे यांचा राज्यसभा कार्यकाळ सहा वर्ष पूर्ण होत आहे. डॉ. विकास महात्मे हे धनगर समाजातून पहिल्यांदा राज्यसभेवर जाणारे खासदार आहेत. अति-सामान्य कुटुंबातून पुढे येत आपल्या कष्टाच्या जोरावर संघर्षातून घडलेलं हे व्यक्तिमत्व. नेत्रतज्ञ म्हणून त्यांनी केलेल्या प्रचंड कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ.महात्मे यांच्या बद्दल बोलत असताना डॉ.स्नेहा सोनकाटे म्हणाल्या की ,डॉ.महात्मे साहेबांच्या बरोबर काम करण्याची संधी मला खूप वेळा मिळाली. मला उमरगा ते दिल्लीपर्यंत राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी तसेच विविध प्रमुख राज्यात सामजिक कार्यक्रमास सहभाग डॉ.महात्मे सरांमुळे मिळाली. अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होऊन तळमळीने प्रश्न सोडवणारा खासदार मी पहिल्यांदा आयुष्यात अनुभवला. त्यांच्या वागण्यातला.. बोलण्यातला साधेपणा आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना खूप काही शिकवून जातो. त्यांच्या अभ्यासू वृत्तीने राज्यसभेमध्ये अनेक समाज हिताचे प्रश्न उपस्थित करून देशवासियांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडली. संसदेमध्ये उत्तम काम करत कायदे आणले सर्व घटकांना न्याय दिला परंतु कधीही दिखावा केला नाही. मागास,दुर्लक्षित, अशिक्षित, वंचित धनगर समाजाला न्याय देण्यासाठी “धनगर समाज संघर्ष समिती” स्थापन केली. त्या माध्यमातून धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढाई चालू आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा दैदीप्यमान इतिहास जागृत व्हावा यासाठी त्यांनी राज्यभर अनेक कार्यक्रम घेतले. महाराष्ट्रामध्ये त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक आणि सभागृहासाठी प्रत्येकी ६० लाख रुपये निधी देऊन आज महाराष्ट्रामध्ये ६० सभागृहे निर्माण केली आहेत.
डॉ. महात्मे साहेबांचे आणि आमचे कुटुंबीय वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असल्याने आणि सामाजिक कार्यामुळे आई-वडिलांपासून आमचे कौटुंबिक जवळचे ऋणानुबंध खूप वर्षा पासून आहेत. साहेबांच्या सहवासामुळे मी भाजपमध्ये सक्रिय झाले. राजकारणासोबत समाजसेवा, रुग्णसेवा, समाजाप्रती असणारी आस्था यामुळे मला काम करण्यासाठी प्रेरणा मिळत असते. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे विचार, संस्कार त्यांच्या वागण्यातून, रुग्णसेवेतून, समाजसेवेतून मी शिकत आले त्यामुळे मला काम करण्याची प्रेरणा मिळाली.
साहेबांनी आणि सुनिता मॅडम यांनी मला मुली प्रमाणे जपले खूप प्रेम दिले. त्याचबरोबर नेहमी मार्गदर्शन केले . माझ्या आई सौ विजया सोनकाटे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात पीडित महिला तसेच विविध घटकासाठी २५ वर्ष सामाजिक कामात आपले जीवन समर्पित केले. त्या कामांचे नेहमी डॉ. महात्मे साहेब आणि मॅडम यांनी नेहमी कौतुक केले. प्रत्येक सामाजिक कार्यात सहभागी करून घेतले व समाज हिताची कामे केली. समाजाला नेहमी दिशा देण्याचे काम केले. महात्मे साहेबांना पुनश्च एकदा राज्यसभेवरती संधी मिळावी अशी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे असे मत व्यक्त केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजातील असामान्य नेतृत्वाला शोधून संधी दिल्याबद्दल त्यांचेही डॉ सोनकाटे यांनी आभार मानले..
डॉ.महात्मे यानंतरही त्याच उत्साहाने त्याच ताकतीने देश पातळीवर समाजासाठी काम करत राहतील असा विश्वास व्यक्त करत एक नम्र, संवेदनशील व्यक्तिमत्व डॉ. विकास महात्मे यांना डॉ.स्नेहा सोनकाटे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.