( मालवणी कथा मालिका)
कलटी.. पलटी…!
(कथेतील सर्व पात्रे,नांवं,स्थळं व प्रसंग काल्पनिक आहेत. कथेमध्ये येणारे बोली भाषेत येणारे काही शब्द हे शिव्या वाटल्या तर तो गैरसमज असेल…त्या “गाळ्या” आहेत.अस्सल गोड मालवणी गळ्यातून येणार्या सहज भावना म्हणजे गाळ्या. .! कोणालाही दुखावायचा तथा असंस्कृतपणाचा इथे संबंध व प्रयत्न नाही…!)
कलटी ..पलटी..!
” ह्या हाली रोजचाच झाला हा…! सहा वर्षांपूर्वी बंड्याशेठचा दुकान नविन नविन सुरु झालेला त्यावेळाक बरोब्बर आठच्या ठोक्याक धंदो चालू होय होतो….आता दहा काय नि अकरा काय…! आपला उघडुचा म्हणान उघाडतंत. .!त्यांका म्हायत आसा….गिर्हाईक जावन जावन खय जातला. ..खपाची तितकी माडी खपतलीच …! श्या. ..हयसर किती आणि कसलो सोस लागलो हा गळ्याक..?” बंड्याशेठच्या माडीछपराबाहेर इठूची आपली बडबड चालू होती.
बंड्या गांवकरान ह्या माडी छपराचा लायसन घेवन जवळपास सहा वर्षा झालेली. दरवर्षी जिल्ह्याच्या ठिकाणच्या लिलावांत त्याना ह्या दुकानाचा लायसन स्वतःकडे ठेवचो आटोकाट यशस्वी प्रयत्न केलेल्यान.!
दुकान उघाडल्याच्या पयल्या दिवसापासना इठू त्या दुकानचा गिर्हाईक..म्हणजे तसा पयलाच गिर्हाईक म्हणलात तरी चलात कारण बंड्या गांवकराच्या माडी छपरातल्या माडियेचो पयलो ग्लास इठूनच पिलेल्यान..! नंतर नंतर छपरातल्या धंद्याचो जसो जम बसत गेलो तसतसो थय येणारे बहुतेक सगळेच बंड्या गांवकराचे खास बनान गेले. काही महिन्यांन तर बंड्यानं छपरात कामासाठी एक पोरगो ठेयल्यान. आता त्याका कारणय तसाच होता . बंड्या गांवकर ही तशी खूप मोठी हस्ती..! चिर्याचे खाणी,चार डंपर,आंब्याचे बागे,शेती,एक चायनिजचा बारिकसा हाॅटेल,गांवच्या देवळाचो मानकरी असे एक नाय अनेक व्याप त्याका होते.
त्याची सवयच ‘धंदो’ करुची होती. म्हणजे एखादो धंदो सुरु करायचो आणि थेतूर दोनचार जणांका कामाक ठेवन स्वतः तेच्यात फक्त काय होयानको ता बघायचा अशी त्याची एक धंदो करुची ठरलेली पद्धत होती. बेकार फिरणार्यांका चार कामा देऊची त्याची वृत्ती होती. आता सि.सि.टि.व्ही. इल्याकारणान तसो फसवाफसविचो धोकोपण कमी झालेलो. पण माडी छपरात सि.सी.टि.व्ही. कॅमेरोच शक्य नव्हतो कारण छप्पर चुडतान कुडलेला आणि तसा ‘आव जाव ..घर तुमचाच ..!’
माडी तशी मोजून मापूनच येई. त्याचो ठरलेलो हिशोब होतो म्हणजे इतकी लिटर खपली की इतके पैसे थय असाकच होये, ह्या गणित सोप्या आणि सरळ होता. पण आता हल्ली माडियेच्या धंद्याच्या टायमार वायच फरक पडलेलो ही गजाल मात्र खरीच होती.
आज इठू शाप पेटान उठलेलो. मधल्या काही वर्षात स्वतः इठूनपण बंड्याशेठचो कामगार म्हणून काम बघलेल्यान पण नंतर त्याका एकदा मलेरिया झालो आणि मग इठूच्या बायलेन माडियेच्या बॅरलजवळ रवाचा काम करुक त्याका मज्जाव केल्यान..कारण माडियेच्या वलसांडीक मुरकुटा, मोठे मच्छर आणि मास्के घोंगायत आसतत.
साधारण दहा वाजाक इले तसो बंड्याशेठची माडी घेऊन येणारो रिक्श्यावालो मळेकार त्याच्या रिक्शेन छपराकडे हजर झालो.
आता रिक्शा छपराच्या बाजुक लायल्यार माडियेचे दोन मोठे कॅन उतरवचे सोडून त्याना पयली त्याची सिगारेट पेटयल्यान.
इठूचो गळो माडियेच्या तहानेन आधीच सुकलेलो आणि थेतूर मळेकराक सिगारेट फुकताना बघून इठूचा मस्तक शाप सनाकला..!
माडी छपराच्या बाजूक वडगान ठेवलेल्या स्वतःच्याच सायकलीची घंटा वाजयीत इठू सरसाईत येईत बोंबाललो,
” अरे तिरकम टेकड्या मळेकारा. …मायझया. एकतर आपल्या घरच्या घड्याळाच्या हिशोबात चलतं वर हय पोचाक उशिर करतं आणि नंतर हय आमका कॅना उतरवुन देवची सोडून सिगारेटी फुकतं…?
म्हणजे तुझी सिगारेट वडान होयसर आम्ही झक मारत कंटाळान कॅना उचलून भुतूर नेतलंव आणि बॅरलात पलटी मारतलंव…
आणि कामचोर बैला हमालीसकटचा भाडा मात्र बंड्याशेठ तुका देतलो….!”
माडीछपरात आधीच येवन बसलेले रतनो आणि शैलो इठूच्या कॅसेटीक आधीच तासभर ऐकान वैतागलेले.
तो काय चुकिचा बोला नाय होतो पण भवानिच्या टायमार छपरांत गाळीये चालू झालेकी त्या किलेशात सगळ्या इरडिचो कुळक्शा होवन जाई म्हणान दोघे इठूच्या बडबडीक वैतागत होते .
रिक्शावाल्या मळेकराची सिगारेट फुकान होयसर रतन आणि शैल्यान माडीचे कॅन भुतूर आणून चाळीस लिटर माडीचे दोन कॅन बॅरलात वतून घेतल्यानी.
रिक्षेच्या सीटी पाठचो ‘रतन्याचो आणि शैल्याचो’ खास दहा लिटरचो गॅसच्या खाट्या माडियेचो म्हणजे छपरातल्या भाषेत ‘कारगील’ वालो कॅनपण दोघवल्यांची उतरुन स्वतःकडे घेतलो.
पाच दहा मिनिटा गेल्यार मग बंड्याशेठचो कामगार ,’स्वप्नो’ थय हजर झालो पण तवसर इठून सगळी ग्लासा चकचकीत धुवून पाण्याचे दोन बादले भरुन ठेवल्यान.
आता स्वप्न्याक इठू भोसाडतलो ह्या लक्षात घेवन शैल्यान स्वप्न्याक सरळ,” पिऊचा पाणी भर रे..बत्ती लावुन झालीहा. ..देवाची माडी इठू ओतीत बाहेर. .”,असा सांगून बावडेर पिटाळल्यान.
“देवाची माडी” वतूचो मान इठूक मिळाल्यामुळे इठूचो राग वायच निवाळलो पण आजुनय तो रिक्शावाल्या मळेकराकडे बघून कायतरी पुटपुटा होतोच.
रिक्शावालो मळेकार तसो गावातल्या सगळ्या दुकानांची माडी घेवन येई.
बंड्या गांवकराचा माडीछप्पर हो त्याचो माडी उतरवचो शेवटचो अड्डो होतो कारण बंड्याची माडी जास्ती म्हणान कॅन मोठे आणि त्याचा दुकानय तसा गावाच्या बाहेर.
इठूसारखी बंड्याची अनेक गिर्हायका मळेकराक उशिर होता म्हणान रोज गाळी घालीत खरी पण त्याचो मळेकरार तसो कायच परिणाम कधीच होवक नाय उलट तो सगळ्यांकडे बघून हसान खेळान सिगारेटी फुकी.
कधीकधी तर बोलता बोलता मळेकार गिर्हाइकातल्याच कोणाकतरी सिगारेट आणुक लावून फुकान टाकी. …!
स्वप्नो पाणी आणुक बावडेर गेलो तशी इठून आपली गोड्या माडियेची एक बाटली भरुन घेतल्यान आणि सगळ्यांका दाखवुन गल्ल्यात पैशाक नमस्कार करीत तीस रुपये ठेयल्यान.
इठूचो पारो आता वायच उतारलो आणि तो हसत म्हणालो ,”काय इटमना आसा ना ह्या बंड्याशेठच्या धंद्याची…
हमाल आम्हीच,गिर्हाईक आम्हीच आणि पैश्याचे कॅशीयरपण आमचे आम्हीच. …..आवशिक खाव व्हरान. ..हा…हा. !”
इठूचो मूड जाग्यार इलेलो बघून माडीछपरातला वातावरण एकदम प्रसन्न झाला.
मळेकराकडे बघून इठू आता नाटकीपणानं बोललो,” गो मळेकारणी. ….तुका सोडलंय समजा नको हा….कधीतरी बंड्याच्या समोर तुझ्यार वार करतलंय.
तू वाटेत थांबान कोणाकतरी चोरियांडी माडी घालीत आसतलं असो माझो संशय आसा. .
इतक्या ऐंशी लिटरातली पाच लिटर काढून भुतूर पानी घातलं तरी आमका काय देठा समाजतली. ..?
आं…काय रे….
गप सो….कोनचो मंत्र घेतलं हं तोंडात ? गप झालं तो..
म्हणजे कोनचो जप नायतर मंत्र घेतलं हं मुखात…?
इतके गाळी खावनपण निस्क्यासारखो गप रवान हसतं हं म्हणान इचारतंय रे…!
तुझी रोजची नाटका खूप झाली आता….!”
ह्या ऐकान रिक्शावालो मळेकार आता आणखी हसाक लागलो आणि वायच नाटकी भियाल्यासारखो करुन म्हणलो, ” ओके इठूशेठ. ..परत नाय ओ चुकाचंव. ….हा..हा..!”
आता इठू हसत हसत बाहेर जावन त्याच्या सायकलीक लायलेली कापडी पिशी घेवन इलो.
भुतुरना सिगारेटिचा एक पाकिट काढून त्याना मळेकराक दिल्यान आणि म्हणलो, ” घे..मायझया….तुका खूश नाय ठेवलंव तर मायझया आमका मारुन घालशील.
वाटेत येताना माडियेत कायतरी,कसलातरी इषबिष मिक्स करुन जीवबिव घेशी आमचो रागात…!
काय रे शैल्या. ……खरा म रे..?”
गेली सहा वर्षा, दर दोन दिवसांनी इठू न चुकता मळेकराक सिगारेटीचा एक पाकिट देई.
मळेकारानं अगदी खूश होवन इठूकडे बघून डोळो मारल्यान…
आणि म्हणलो, ” ह्या वर्षिचो लिलाव तूच घे इठू. ..बंड्याशेठला लिलावादिवशी किडनॅप करुन ढापुन ठेवया खयतरी. ..हा..हा….!”
आता सगळेच हसाक लागले.
“चला रे..चलतंय.
आणखी माडी लागली तर स्वप्न्याक माडकाराक फोन करुक सांगा.
माडकारान सांगल्यान हा आणखीन लागली तर मिळात म्हणान.
चलतंय. … वायच ऊन वाढाच्या आधी घराक पोचाया ना..!”
मळेकराची रिक्शा गेली तशी स्वप्नो पिवच्या पाण्याचे कळशे घेवन दुकानात इलो.
झाडू,साफसफाई,बत्ती, माडी ओतणे,ग्लासा धुणे आणि बोहनी वगैरे सोपस्कार आधिच पुरे झाले होते म्हणजे तसा काय अवघड काम त्याका उराकच नव्हता. ..
इठूपण पोटात एक बाटली गोड माडी ढकलून शांत झालेलो. ..रतनो आणि शैलो त्यांच्या खास गॅसच्या खाट्या माडिच्या कॅनातलो एकेक ग्लास रिचवून पेपर वाची होते इतक्यात माडी छपरासमोरच्या रस्त्यापलिकडल्या कळिंगणाच्या बागेत कामाक असलेलो स्टॅनलो त्याच्या सायकलीरना उतरत माडीछपरात येवन, धापा टाकीत बोलाक लागलो, ” रतन्या, शैल्या. ..उठा…उठा…चला चला….एक्सिडेंट झालो हा काजियेबुडी ..!”
काजियेबुडी म्हणजे माडीछपरापासना अगदी दोन मिनिटार. .
इठून आंग काढित इचारल्यान, ” कोनचो रे ..? ..पर्यटकांचो काय…?”
तसो स्टॅनलो आणखी जोरात आरडान म्हणल्यान, ” नाय रे बाबा….
आपल्या मानसाचो. .
मळेकराचो…
काजियेबुडी रिक्शा पलटी झाली…
समोरसून किंवा पाठसून कोणयेक नाय तरी रिक्शा कशी ती रोड सोडून कलाटली. ..
मळेकराच्या टकलेतना ह्या रक्त व्हावा होता. ..
बंड्याशेठ थयना येईच होते…त्यांच्याच गाडियेतना सरकारी दवाखान्यात नेल्यानी हा…
ते पोलिस बिलिस येवच्या आधी रिक्शा काजियेतच भुतूर ढकलून ठेवची आसा….चला..बंड्याशेठचो निरोप आसा..शैल्याक आणि रतन्याक…!”
स्टॅनल्याचा बोलणा ऐकान सगळेच दनाकले. पंधरा मिनिटांपूर्वी हसान खेळान निरोप दिलेल्या मळेकराचो असो चापकन् अपघात होईत ह्यो कोणाक आसभासपण नव्हतो.
रतन्यान आणि शैल्यान त्यांच्या माडियेच्या कॅनाक बुच मारुन त्यांच्या खासजागेत म्हणजे गल्ल्याच्या टेबलाच्या खाली ठेवल्यानी.
स्टॅनल्याक वायच धीर देवन त्याका ग्लासभर थंड माडी देवन दोघवले बंड्याशेठची स्वप्न्याक वापरुक दिलेली एक्टिव्हा गाडी घेवन काजियेबुडी पोचले.
अजून तशी जास्त आरड झालेली दिसा नाय होती फक्त दोनचार लमाणी बायका रिक्शेकडे थांबान बघी होते.
शैल्यान त्यांका वायच दरडावत इचारल्यान, ” काय बापाशिचा लगिन हा….वरातिक होयी हा रिक्शा…?
चला हयना. …पोलिस येतीत हा…पकडून नेतीत. …!”
ती बायका आपली वायच भियाली पण थेतूरली एक बाई धीर करुन म्हणली,” काय दादा. .गरिबाची चेष्टा करताय. रिक्शा पल्टी दिसली म्हणून बघायला थांबलो ओ….आम्ही कामावर चाललोय. ..!”
शैल्यान त्यांका हात जोडीत म्हणल्यान, ” गे आवशी मग जा गे कामार. ..हय कशाक घुटमाळत रवलास. ..चला हयना..!”
लमाणी बायका थयना गेल्यार रतन्या आणि शैल्यान रिक्शा उचलून सरळ केली आणि काजियेच्या बागेत शाप भुतूर दिसेनाशी करुन ठेवली. ..
चुडताची पेंडी करुन रस्त्यारचे काचीपण त्यांनी लोटून बाजुक केले.
एकंदर मळेकराक खूप लागला आसतला असो दोघवल्यांका अंदाज इलो.
टकलेर आणखी जोर नको म्हणून रतन्यान गाडी सरळ दवाखान्यात नेल्यान.
दवाखान्यात बाहेरच बंड्याशेठ गांवकार उभे होते.
शैल्याक आणि रतन्याक हळू आवाजात त्यांनी इचारल्यानी, “रिक्शा….?”
त्यावर शैलो म्हणलो, ” बरोबर काढलंव सायटीक. ..भिया नको. .कोणाक काय कळाक नाय हा अजून…!”
बंड्या गांवकरान हसत म्हणल्यान, ” अरे मायझयानू. ..मी कशाक भियातलंय..?
सावंत हवालदार माझ्यावांगडाच होते गाडियेत.
रितसर रिपोर्ट केलंव आम्हीच.
पण कोणाक काय नुकसान नाय आणि ड्रायव्हर शुद्धीत आसा म्हणान प्रकरण,पंचनामो वगैरे नको इतक्याच काय ता मी सांगलंय.
मी रिक्शा बाजुक लावुक सांगलंय कारण जाणार्या येणार्याक त्रास नको वगीच. ..!”
आता रतनो आणि शैलो वायच खजील झाले पण मळेकार बरो आसा ह्या ऐकान ते खूश झाले.
पाठोपाठ डोळ्यातना धो धो पाणी घेवन,सायकलवरना इठू इलो…
“माका मळेकराक भेटाचा हा…”, असा म्हणत इठून बंड्याशेठच्या गळ्याकच मिठी मारल्यान.
इठूचो हात सोडवून बंड्याशेठना खुणेन त्याका मळेकराचो वाॅर्ड दाखवल्यान.
रतनो,शैलो आणि इठू मिळान वाॅर्डात गेले.
मळेकार खाटीर बसान मस्त केळा खाई होतो.
हातिक वायचशी पट्टी होती पण टकलेक कायच नव्हता.
“स्टॅनल्यान तर टकलेतना रक्त व्हावता सांगलेल्यान. …”, असा रतनो म्हणलो पण मळेकराक सुखरुप बघून त्याना इषय ताणूक नाय.
इठून मळेकराच्या पायाजवळ जाईत त्याका इचारल्यान, ” अरे काय झाला. ……कसो कलाटलं. ..?”
मळेकराक कोणतरी त्याका बघुक इल्याचो आनंद झालेलो.
तो हसत आणि वायच थोड्या गंभीरपणाने म्हणलो,” काय नाय रे इठू…
रोजच होता तसा पण आज वायच जास्त झाला.
सकाळीच माडी लवकर आणुची म्हणान फाटफटी चाराकच रिक्शा काढूची लागता.
मगे साधारण शंभर फूटतरी सगळे कॅन चलत,उचलून घेवन येवन मग रिक्शेत ठेवचे लागतत.
ते माडकार शेंदूर फासून आसतंत कारण रिक्शेत माडी भरुची हमाली ह्या त्यांचा काम नाय …!
मग उपाशीपोटी माकाच ते सर्कशी करुचे लागतत.
नंतर इतके सगळे कॅन घेवन येताना अक्षरशः टॅन्कर चलवल्यासारखीच रिक्शापन डचमाळता. …
आणि रिक्शेचा हॅन्डल एका सायटीक खेचनारा आसल्याकारणान हातीर लोड येता. रोजच येता…
आज वायच जास्त इलो.
हात सुन पडान दुखाख लागलो म्हणान तो दुसर्या हातिन दाबुक गेलंय तर हॅन्डलच सुटला रे ….
चापकन हॅन्डल फिरान रिक्शा पलाटली.
पण मी दुसर्या बाजुक रेतीत फेकलो जावन कलाटलंय . येळ बरो रे….येळ बरो माझो.
तुझ्या सिगारेटीच्या पाकिटामुळे दोन चार मिनिटा तरी वेळ टळली माझी.
तू माका गाळी घालित रवलं आणि सिगारेट पाकिट दिलं म्हणान तर टाईम वायच कटलो ना थय….?”
आता इठूक खाल्याहून खाल्यासारखा झाला.
तो मळेकराक हात जोडीत म्हणलो ,” ए भल्या मान्सा.
तू आपलो तुझ्या तब्येतीच्या हिशोबात ये रे बाबा रोज.
वायच नाष्टोपाणी करुन येईत जा.
तासभर माडी उशिरा इली म्हणान हय कोण मराचो नाय रे गावात.
मी आपलो असोच चिडत आसतंय तुझ्यार.
पण आमच्यासाठी घाई करुन तुका काय झाला तर आमकाच जीव देवचो लागात.
काय उलटा सुलटा बोललंय आसान तर माफ कर रे मळेकारा. …!”
मळेकरान हसान इठूक जवळ बोलवून मिठी मारल्यान.
जखम वगैरे फारशी नसल्या कारणान मळेकराक दोन एक तासात घराक जावची सोय झालेली होती.
त्याका टाटा करुन तिघवले हाॅस्पिटलच्या बाहेर इले.
रतन्याक अजूनय स्टॅनल्याचा बोलणा आठवा होता.
‘टकलेतना रक्त वगैरे..!’
इतक्यात रतन्याचो फोन वाजलो.
बगल्यान तर माडी छपरातलो कामगार म्हणजे स्वप्नो फोन करता हा .
रतन्यान फोन उचलल्यान. ..
पलिकडना स्वप्नो इचारी होतो, ” स्टॅनल्याचे माडी बाटले कोनच्या खात्यार लिवायचे. ….
रतन्या तुझ्या,शैल्याच्या की इठूच्या. ….?”
रतनो चाट् पडलो.त्याना शैल्याक आणि इठूक इचारल्यान की त्यांनी स्टॅनल्याक माडी देवक सांगलेली काय ती.
दोगवल्यांनी ” आपण नाय सांगुक ब्वा…!” म्हणल्यानी.
तिघवले पुन्हा माडी छपरात इले तेंव्हा एक खळबळजनक गोष्टच समोर इली.
स्टॅनल्याच्या दोनचार मित्रांची खाजनात आग्रार खयतरी पार्टी होती.
त्यांनी कोनचोतरी कोंबो यव्वस्थीत ढापलेल्यानी पण माडियेक त्यांच्यार पैशेच नव्हते.
बंड्याशेठनी स्टॅनल्याची उधारी आधीच बंद केलेली असल्या कारणान त्याची माडी मारुची गोची झालेली.
आग्रारसुन काजियेबुडचा सगळा दिसा.
मळेकराची रिक्शा पलाटलेली बघून मळेकराक बंड्याशेठना दवाखान्यात नेलेल्यापर्यंतचा लाईव्ह चित्रण स्टॅनल्याच्या डोळ्यांनी मस्त टिपला आणि त्याचा डोक्या फास चलान त्याना रतन्या,शैल्या आणि इठूक एक्सिडेंटचा वर्णन चढवून वाढवून करुन मस्त भावनिक गरगरावन टाकलो.
बंड्याशेठचे तिघवले आडदांड पंटर माडीछपरातना बाहेर गेल्यार स्टॅनल्यान बसल्या जाग्यार दोन बाटले माडी पिऊन पाच बाटले पार्सलचे पण नेल्यान.
एकूण दोनशे दहा रुपयाची गदा ,”ते देतले” असा सांगून,स्वप्न्याच्या हातित देवन स्टॅनलो थयना ओव्हर एन्ड आऊट झालो. इतर गिर्हाईकाच्या धांदलीत स्वप्न्यान त्याका थांबवुक नाय.
रतनो ,शैलो आणि इठू तिघांकाय म्हायती होता की स्टॅनलो पैशे ठकवचो नाय पण नेमके कधी देईत त्याचीय खात्री नाय….!
“मायझयाच्या बागेतली तीन मोठी कळिंगणाच उचलतंय. ..बघ जाग्यार पैशे वसूल …!” असा म्हणत इठूनं चुडतात खुपासलेला एक शिमिटचा बारदान घेईत सायकलीर ढ्यांग टाकल्यान.
शैलो आणि रतनो एकमेकांकडे बघून हसा होते कारण आता इठू नक्कीची सहा तरी कळिंगणा उचलून ती इकून पैशे वसूल करुन बंड्याशेठसमोर काॅलर ताठ केल्याशिवाय रवणार नव्हतोच …
हसू दाबित दोघवल्यांनी स्वप्न्याक धीर देईत सांगितल्यानी, ” भिया नको हा..
इठूशेठ देतले पैशे….वसूल करुन. ..!”
************************************
लेखक : सुयोग पंडित
©Suyog Pandit.