बांदा |राकेश परब :
एखाद्या इमारतीचा पाया मजबूत असेल तर त्यावर कितीही मजले चढवले तरीही ती इमारत वर्षानुवर्षे मजबूत राहते, असेच काहीसे लहान मुलांच्या बाबतीत पण आहे, लहान मुलांची आकलन शक्ती खूप जास्त असते त्यामुळॆ लहान वयात किंवा प्राथमिक काळात जर मुलाचा पाया घट्ट करून घेतला तर त्यांचे भविष्य आणि कारकीर्द उज्वल होऊ शकते.पण गेले २ वर्षे कोविडमुळे सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले, घरी असल्यामुळे मुलांमधील मोबाईल वापराचे प्रमाण खूप वाढले त्यामुळे आभासाकडे दुर्लक्ष झालेच पण असे बरेच विद्यार्थी इंटरनेट आणि मोबाईलची सुविधा नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिले.
अशा हजारो विद्यार्थ्यांचा पाया मजबूत केले नाही तर पुढील शिक्षण घेताना त्यांना खूप कठीण जाईल आणि त्यांच्या यशाचा मार्ग खडतर होईल म्हणून कोकण संस्थेने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे त्याचे नाव आहे ड्रीम पाया.
आज पालघर येथील २ शाळात हा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. पुढील वर्षभर हा कार्यक्रम चालणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांचा शैक्षणिक पाया पक्का होण्यासाठी मदत होणारच आहे पण कोविडमुळे अभासक्रमात मागे राहिलेल्या मुलांचा पाया भक्कम होणार, आदिवासी आणि दुर्गम भागातील शेकडो विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन सुधारण्यास मदत होणार आहे,
शैक्षणिक स्कॉलरशिप मिळण्यास मदत होईल,
गणितातील बुद्धिमत्ता वाढेल, मुलांचा बौद्धिक विकास होण्यास मदत होईल, मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल आणि गणितात जास्त मार्क्स मिळण्यास मदतही होणार आहे.
जिल्हा परिषद शाळा वेवुर येथील ५७ विद्यार्थी आणि सांबरेपाडा येथील ३४ विद्यार्थी यांना या उपक्रमाचा फायदा होणार असून आज झालेल्या कार्यक्रमात वेवुर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन पाटील, पदवीधर शिक्षक विनोद पाटील, शिक्षक वृंद तसेच सांबरेपाडा प्रमुख शिक्षक गजानन अनेमवाड व शांत सर उपस्थित होते.
यावेळी कोकण संस्थेचे पालघर विभागीय अध्यक्ष श्री. अजित दळवी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला कोकण संस्थेचे मुंबई व्यवस्थापक सुरज कदम, साक्षी पोटे, फरहान शेख, आदिती खरात, रोशन पडवणकर, भावेश मोरे, सचिन धोपट कार्यकर्ते तसेच विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.