मालवण | संपादकीय विशेष : एकोणीसशे सत्तरचे दशक. भारतीय सेना तिची तांत्रिक बांधणी मजबूत करु इच्छित होती. परंतु दळण वळणाची अत्याधुनिक साधने प्रत्येक भारतीय सैन्य तुकडीकडे अजून परिणामकारकपणे पोचू शकली नव्हती. मानवी विचारप्रणाली,तर्क आणि मागील युद्धांतील आराखडे यांचेच थोडे नूतनीकरण करुन संपूर्ण मानवी बुद्धी व शक्तीवर बहुतांश भारतीय सैनीक तेंव्हा लढा देत होते आणि सीमेचे रक्षण करत होते.
भारतीय सैन्याच्या हातबॉम्ब फेकणाऱ्या सैन्याच्या चौथ्या बटालियन मध्ये असणाऱ्या ३२ वर्षीय कंपनी कॉटरमास्टर हवालदार अब्दुल हमीद ही सैनीक व्यक्ती त्याच काळातील किंवा वर्गातील म्हणता येईल.
१९३३ रोजी गाझीपुर जिल्ह्यातील धामुपूर गावामध्ये अब्दुल हमीद यांचा जन्म झाला. त्यांचे जीवन अतिशय कष्टाचे होते. अब्दुल यांचे वडिल व्यवसायाने शिंपी होते आणि अब्दुल त्यांच्या दुकानात आपले शिक्षण सांभाळून त्यांना मदत करत असत.
देवा येथील जुनियर हायस्कूल मधून त्यांनी आपले ८ वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. ते बौद्धिक व शारिरीक साहसी गोष्टी करण्यासाठी नेहमी आतुर असत.
पोहणे, कुस्ती करणे, शिकार करणे, गटक खेळणे या सारख्या खेळांची त्यांना भयंकर आवड होती. ‘गटक’ म्हणजे शिख समाजातील तलवारबाजीचा एक खेळ आहे. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांचे लग्न रसोलन बीबी यांच्या बरोबर झाले होते.
१९५४ मध्ये वाराणसीच्या प्रशिक्षण शिबिरात अब्दुल यांची भारतीय लष्करात भरती करण्यात आली. लवकरच त्यांनी नासिराबादमधील ग्रेनेडियर रेजिमेंटल केंद्रामध्ये आपले प्रशिक्षण पूर्ण केले आणि १९५५ मध्ये त्यांना ४ ग्रेनेडियर्स मध्ये तैनात करण्यात आले.
१९६२ मध्ये भारत – चीन युद्धामध्ये ७ माउंटन ब्रिगेडमधून त्यांनी लढा दिला होता. युद्ध संपल्यानंतर लगेचच त्यांना अंबाला येथे पाठवण्यात आले. तेथे त्यांना ॲडमिनीस्ट्रेशन कंपनीचे कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार म्हणून नियुक्त करण्यात आले.
याच पदावर असताना १९६५ मध्ये झालेल्या भारत – पाक युद्धामध्ये अब्दुल हमीद यांनी शत्रूला न जुमानता आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी शौर्याने लढा दिला.
दोन लाख चौसष्ठ हजार पाकिस्तानी सैनीक भारतावर चाल करुन येत होते. अब्दुल हमीद हे सुरुवातीपासूनच तरबेज नेमबाज होते आणि अँटी टँक गन्सवरील त्यांचे कौशल्य कुशल अधिकाऱ्यांच्या उत्कृष्टतेप्रमाणे होते.
जेव्हा डीटॅचमेंट कमांडर शिवाय ४ ग्रेनेडीयर्स अँटी टँक युद्धात उतरवले, तेव्हा अब्दुल हमीद यांना अँटी टँक आर सी एल. गन्स राखण्याची जबाबदारी दिली होती.९ सप्टेंबर १९६५ मध्ये पाकिस्तानी टँक असल अटर भागात मार्गात येईल ती गोष्ट चिरडत मार्गाक्रमण करत होते. पण अब्दुल हमीद हे सुद्धा त्यांच्या समोर पाय रोवून उभे राहिले.
समोरून येणाऱ्या शत्रूला रोखण्याच्या उद्देशाने अब्दुल हे दुसऱ्या महायुद्धामध्ये वापरण्यात येणारी जुनी १०६ एम एम.आर.सी.एल. अँटी टँक बंदूक बेफामपणे चालवू लागले.त्यांनी काही क्षणात शत्रूचे तीन टँक उडवले. चौथा टँक (रणगाडा) तर त्यांनी अचानक पण अचूक नेम लावत एका झटक्यात उडवला. शत्रू मागे हटला. पण पुढच्याच दिवशी १० तारखेला पुन्हा समोर आला. यावेळी देखील त्यांना अद्दल घडवायचा जणू अब्दुल यांनी प्रण केला होता.
१० सप्टेंबर १९६५ च्या दिवशी त्यांनी पाकिस्तानी सैन्याचे अजून दोन टँक्स नष्ट केले. पाकिस्तानी सैन्याने त्यांना हेरले आणि त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरु केला. अजिबात न डगमगता अब्दुल यांनी आपला लढा सुरूच ठेवला.अजून एक टँक नेस्तनाबूत करून त्यांनी शेवटच्या ८ व्या टँककडे आपला मोर्चा वळवला, अब्दुल यांनी आपल्या अचूक निशाण्याने तो ८ वा टँक ही उडवला.
पण दुर्दैवाने त्याच वेळा त्या टँक मधून निघालेल्या गोळ्याने अब्दुल यांच्या जीपला देखील लक्ष्य केले. आपले कार्य पूर्ण करून अब्दुल हमीद शहीद झाले.
त्यांच्या या कामगिरीची संपूर्ण देशाने दखल घेतली. त्यांच्या जाण्याने भारतीय सैन्याने एक शूर वीर गमावला. १९६६ मध्ये त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.
त्याच युद्धामध्ये पुढे भारतीय सैन्याने अतुलनीय शौर्य गाजवत पाकिस्तानचे ४० टँक्स उडवले आणि त्यानंतर २५ – ३० टँक काबीज केले व पाकिस्तानवर विजय मिळवला.
या युद्धात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शहीद अब्दुल हमीद यांना त्यांच्या जयंती निमित्त कृतज्ञतेची मानवंदना.
सुयोग पंडित (मुख्य संपादक/आपली सिंधुनगरी चॅनेल)
विनम्र अभिवादन