चिंदर / विवेक परब :
वीज पुरवठा सुरळीत चालू रहावा यासाठी आपले कर्तव्य चोख बजावत असताना, आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आनंद मिराशी या कंत्राटी कर्मचाऱ्याला अखेर कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, मिठबांव सरपंच भाई नरे आणि संदीप साटम यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय मिळवून देत सबंधित ठेकेदाराकडून भरघोस अशी मदत मिळवून दिली आहे. मंगळवारी सायंकाळी भाई नरे, जि.प.माजी बांधकाम सभापती जेरोन फर्नांडिस, आचरा सोसायटी उपाध्यक्ष संतोष मिराशी, विजय(बाबू) कदम, यल्लापा, गुरव, राम लोके उपस्थित होते.
आनंद मिराशी याच्या घरी जाऊन त्याचे वडील कृष्णा मिराशी, नातेवाईक संतोष मिराशी, शर्मिला मिराशी यांच्याकडे लाखो रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. यावेळी अशाच प्रकारे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही त्यांनी देखील दिली आहे. त्यांनी केलेल्या या कामाबद्दल आचरा वासियांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.