मुसळधार पाऊस आणि पाण्याचा वेग अडवून ठेवू शकतात अनेक वाहने....; अनुचित् घटनेपेक्षा खबरदारी महत्वाची नाही का?
वैभववाडी | नवलराज काळे (विशेष लक्षवेधी): गत वर्षी म्हणजे साल 2021 ला झालेल्या मुसळधार पावसामुळे करूळ घाटातील रस्त्यावर डोंगराचा मोठा भाग घसरून रस्त्यावर आला होता. दरड स्वरुपापेक्षाही त्याची तीव्रता अधिक होती. त्यावेळी बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात रस्त्यावरील दरडी बाजूला करून वाहतूक सुरू केली होती. त्यांनतर संबंधित ठिकाणी पुन्हा पहाणी व डागडुजी वगैरेकडे संबंधीत खात्याने सध्यातरी पाहिलेले दिसत नाही.
गेल्या तीन दिवसांपासून वैभववाडी तालुक्याच्या परिसरात पावसाला जोरदार सुरवात झाली आहे. त्यामुळे करूळ घाटातील धबधबे देखील प्रवाहित झाले आहेत. गेल्या वर्षी वाहून आलेल्या घाट रस्त्यावरील डोंगराच्या मोठ्या भागामुळे तेथे नवीन मोठा धबधबा प्रवाहित झाला असून गेल्या वर्षी तेथील घसरून रस्त्या लगत आलेली माती बांधकाम विभागाने अद्याप काढलेली नाही त्यामुळे डोंगरावरील पाणी धबधब्याच्या स्वरुपात थेट रस्त्यावर आले आहे. रस्त्या लगत असलेली माती बांधकाम विभागाने त्वरित न हटविल्यास पावसाचा जोर सतत कायम राहिला तर धबधब्याचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येणार आहे. त्याचा वेग लक्षात घेता घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी तर होणारच शिवाय अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
घाट,नैसर्गिक आपत्ती या गोष्टी करुळ घाटाच्या बाबतीत प्रतिवर्षी गृहीत धरल्या जातात. पाऊस संपल्यानंतर जवळपास आठ महिने यावर संबंधीत खाते नीट अभ्यास करुन उपाययोजना करु शकते. अपघात व कोंडीचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे एखाद दुसरा तुरळक प्रकार घडला तर त्याची तीव्रता कमी असेल व वाहतुक कोंडीही टाळता येईल.
नाहीतर प्रतिवर्षी प्रमाणे वाहतुक कोंडी झाली तर प्रवासी वर्गाला तथा वाहन चालकांना ‘वर्षा पर्यटन’ही संकल्पना नकारात्मक व नाईलाजाने भोगावी लागेल.