गुरुवर्य य. बा. चोपडे शिक्षक गौरव पुरस्कार गुरुनाथ ताम्हणकर यांना प्रदान…!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने दिला जाणारा गुरुवर्य य.बा. चोपडे शिक्षक गौरव पुरस्कार जिल्हा परिषद केंद्रशाळा मसुरे नंबर १ चे उपक्रमशील शिक्षक श्री. गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे म्हणाले, “सेवांगणच्या मालवण व कट्टा शाखेने शिष्यवृत्ती मार्गदर्शन, विद्यार्थांसाठी व शिक्षकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करुन शिक्षणाची चळवळ समाजाच्या सर्व थरापर्यंत पोहोचविण्याची उत्तम कामगिरी केली आहे. ताम्हणकर यांचे शैक्षणिक कार्य उत्तम असून त्यांच्याप्रमाणे कार्य करणा-या जिल्ह्यातील अनेक शिक्षकांमुळे शिक्षण विभाग़ाची मान उंचावली आहे.”
जि.प. सिंधुदुर्गचे उपशिक्षणाधिकारी श्री.रामचंद्र आंगणे, सानेगुरुजी कथामाला अध्यक्ष श्री.सुरेश ठाकुर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन श्री.गुरुनाथ ताम्हणकर यांना गौरवण्यात आले. यावेळी व्यासपिठावर बँ. नाथ पै सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष श्री.दीपक भोगटे, कट्टा सेवांगणचे अध्यक्ष श्री. किशोर शिरोडकर , श्रीम.शृंगारे मॅडम, श्री. अरविंद शंकरदास, भाऊ मांजरेकर, श्री. बापू तळवडेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.शिवराज सावंत यांनी भुषविले.
“गुरुवर्य य. बा. चोपडे सर हे भंडारी हायस्कूल मालवणचे माजी आदर्श शिक्षक होते. त्यांच्या नावे बॅ. नाथ पै सेवांगण मालवणच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणा-या प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. जिल्हा परिषद केंद्रशाळा मसुरे नं.1 येथे कार्यरत असलेल्या श्री. गुरुनाथ ताम्हणकर यांनी आपल्या दोन दशकाच्या सेवा कालावधीत विविध शैक्षणिक उपक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रमांतही उत्तम कामगिरी केली. विद्यार्थी व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहेत. यामुळेच त्यांची या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सेवांगणने गेली अनेक वर्षे शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांतून नाथ पै यांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य केले आहे,” असे उद्गार कार्याध्यक्ष श्री. दीपक भोगटे यांनी यावेळी काढले.
श्री. सुरेश ठाकूर यांनी साने गुरुजी आणि नाथ पै यांच्या कार्याची ओळख करुन दिली.
श्री. किशोर शिरोडकर यांनी बॅ. नाथ पै यांच्या विविध पैलूवर प्रकाश टाकून आज त्यांच्या विचार व वागणुकीची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले.
साने गुरुजी पुण्यतिथी कार्यक्रमाचे औचित्य साधून बॅ. नाथ पै सेवांगण मालवणच्या शिक्षण निधीचे कट्टा परिसरातील होतकरु विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
संजय रेंदाळकर लिखित “बॅ. नाथ पै – लोकशाही समाजवादाचा दीपस्तंभ” या पुस्तकाचे प्रकाशन श्री. रामचंद्र आंगणे, श्री. सुरेश ठाकूर, श्री. किशोर शिरोडकर व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सेवांगण कट्टा येथे कार्यरत असलेले श्री. गोंधळी यांना राज्यस्तरीय लोककला संवर्धन पुरस्कार मिळाल्याबद्दल सेवांगणच्या वतीने त्यांचाही शाल व श्रीफळ देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.बाळकृष्ण नांदोसकर यांनी केले. आभार सौ. वैष्णवी लाड यांनी मानले. यावेळी ताम्हणकर सरांचे कुटुंबीय, श्री. अरुण भोगले, हेमंत हडकर, अविनाश नरे, माळगाव ग्रामस्थ व शिक्षकमित्र श्री.परशुराम गुरव, श्री.नवनाथ भोळे, श्री.रामचंद्र कुबल, सौ.शर्वरी सावंत, सौ.तेजल ताम्हणकर, सौ.रश्मी आंगणे, श्रीम.फाटक, श्री.सदानंद कांबळी, श्री.हृदयनाथ गावडे, श्री. विजय चौकेकर व विद्यार्थी उपस्थित होते.