स्थानिकांमध्ये खळबळ..!
बांदा | राकेश परब :
निगुडे – पाटीलवाडीतील घरांना सावंतवाडी तहसील प्रशासनाने पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थलांतराच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे वाडीत एकच खळबळ उडाली आहे. नुकसान भरपाई देणे टाळण्यासाठी प्रशासनाची धडपड असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या बांधणीसाठी टाकलेल्या मातीच्या भरावामुळे पूरस्थिती येत असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले.
निगुडे – पाटीलवाडीत सुमारे २० घरे असून सर्व घरांना स्थलांतराच्या नोटीस तलाठी भाग्यशिला शिंदे यांनी बजावल्या आहेत. ऐन पावसाच्या तोंडावरच नोटीस आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थलांतर करणे ही किरकोळ बाब नव्हे. शेती अवजारे, उपजीविकेचे वर्षभराचे साहित्य, गुरेढोरे व अन्य साहित्य घेऊन स्थलांतर करणे एवढे सोपे नाही. प्रशासनाने केवळ कागदोपत्री पद्धत पूर्ण केली. पूरस्थिती नंतर नुकसान भरपाई देणे टाळण्यासाठी प्रशासनाची धडपड असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय महामार्ग ६६ बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव घालण्यात आल्याने पाटीलवाडीत पूरस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. महामार्गापूर्वीची घरे असून पूरस्थिती निर्माण होणे ही प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयाचा भाग आहे. प्रशासनाच्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.