आडवली हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात..
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
आर.ए.यादव हायस्कूल आडवली शाळेच्या शैक्षणिक वर्षं १९७८-७९ च्या इ.१० वी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला.या स्नेहमेळाव्याचा प्रारंभ १०वी वर्गात विद्यार्थांनी एकत्र बसून माजी मुख्याध्यापक श्री.गावकर सर यांचा संस्कृत विषयावरील अध्यापनातील गोडवा ४३ वर्षानंतर परत एक तासभर अनुभवला.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सकपाळ सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत केले व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन,दीपप्रज्वलन तसेच कै. रजनी साटम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात शालेय गीत व प्रार्थनेने करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबईचे संस्था उपाध्यक्ष सुभाष साटम होते.
यावेळी कार्यक्रमासाठी कमलाकांत कुबल (अध्यक्ष, शाळा समिती, आडवली.), रजनीकांत नाईक साटम, अरुण अनंत लाड, डॉ. सुरेश भिकाजी भोगटे, प्रमोद सावंत,अनंत मालप.मुख्याध्यापक तुषार सकपाळ, श्री.साईनाथ झाडे, नामदेव लाड, चंद्रकांत पराडकर.आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा माजी विद्यार्थांनी शाल, श्रीफळ व प्रेमाचे प्रतीक म्हणून चांदीचे नाणे देऊन यथोचित सत्कार केला.
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थांनी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रशालेतील आपल्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला .माजी विद्यार्थ्यांच्या प्रत्येकांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह ओसंडून वाहतांना दिसत होता. प्रशालेच्या वास्तूबद्दलचे ऋणानुबंधही त्यांच्या बोलण्यातून जाणवले.
ही वास्तू,ही शाळा जिवंत राहिली पाहिजे. या ज्ञानगंगेचा ज्ञानदीप सतत तेवत राहिला पाहिजे.ही शाळा वैभवाच्या शिखरावर जाऊन पोहचली पाहिजे.या प्रशालेतील शिक्षण घेणाऱ्या भावंडाना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे व गरीब होतकरू विद्यार्थी देखील शिक्षणाच्या प्रवाहात राहिला पाहिजे याकरिता माजी विद्यार्थांनी कायम स्वरूपी ठेव म्हणून एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची बहुमोल अशी देणगी संस्था पदाधिकारी व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सकपाळ सर यांच्याकडे प्रेमाने सुपूर्द केली .या रक्कमेवरील व्याजातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा प्रामुख्याने भागविण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन देखील माजी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक यांना केले. व यापुढेही शाळेच्या वाढीसाठी जिथे-जिथे सहकार्य लागेल तिथे आम्ही तुम्हाला सहकार्य करून हे ऋणानुबंध जपण्याचा नक्की प्रयत्न करू असा शब्द माजी विद्यार्थ्यांनी या प्रसंगी दिला.
प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री.गौतम पळसंबकर यांनी इयत्ता दहावी मध्ये इंग्रजी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दहा हजार रुपये रोख रक्कम कायमस्वरूपी ठेव ठेवीत असल्याचे जाहीर केले तसेच माजी मुख्याध्यापक गावकर सर यांनी देखील शाळेच्या विकासासाठी सात हजार रुपयांची देणगी दिली.
सूत्रसंचालन श्री.सकपाळ सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री.मिलिंद फाटक यांनी मानले.