बांदा | राकेश परब : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर तिलारी कालव्याचे पाणी रविवारी सकळी इन्सुलीत दाखल झाले. भूसंपादन होऊन जवळ जवळ वीस वर्षे झाली असल्याने कालव्याला पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मोठी मागणी होती.इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी जानेवारी मध्ये दिवस रात्र असे तीन ते चार दिवस आंदोलन केले होते. त्यांच्या त्या लढ्याला यश आले.गेली दहा वर्षे रखडलेले काम नाटेकर यांच्या आंदोलनानंतर सुरु करण्यात आले. ते काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा पाणी सोडण्यात आले.इन्सुलीत कालव्याचे पाणी दाखल झाल्या नंतर शेतकऱ्यांमधुन समाधान व्यक्त होत आहे.
सुमारे वीस वर्षा पूर्वी तिलारीच्या कालव्या साठी भूसंपादन करण्यात आले होते.त्याच पद्धतीने कामही पूर्ण करण्यात आले.किरकोळ मोठी काम वगळता जवळ जवळ ऐंशी टक्के कामे पहिल्या दहा वर्ष्यात पूर्ण करण्यात आली. तर इन्सुली येथील कामे पूर्ण झाल्यानंतर तब्बल पाच ते सहा वर्षे ओटवणे येथील काम रखडलेले होते. पाणी ओटवणे पर्यंत यायचे मात्र तेथील काम अपूर्ण असल्याने इन्सुली पर्यत पाणी येत नव्हतं. त्यामुळे इन्सुली ग्रामस्थांतून रोष व्यक्त करण्यात येत असे. तर आम्ही कवडीमोल दराने दिलेली जागा हि केवळ पाणी येणार या आशेने दिली असे सांगत. तर इन्सुलीत पाणी येण्यासाठी सर्वच पक्षांनी विविध स्तरावर अनेक निवेदने देऊनही केवळ पावसाळ्याच्या तोंडावर कामे केली जात असत मात्र जानेवारी २०२२ मध्ये ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी तिलारी कार्यालय चराठा येथे ओटवणे येथील काम सुरु पर्यत उठणार नाही असे तीन ते चार दिवस रात्र आंदोलन केलं.
फक्त आंदोलन न करता त्यांनी आठवड्याला एकदा ओटवणे येथे जाऊन कामाची पाहणी केली.काम बंद झाल्यास तात्काळ तेथिल अभियंता किंवा कार्यकारी अभियंता यांना जाणीव करून देत असत. नाटेकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज इन्सुलीत पाणी दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी स्वागत नाटेकर, तिलारी कार्यकारी अभियंता, उप अभियंता व सहा अभियंता यांचे जाहीर आभार मानले.