मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मोंडतर वरचीवाडी येथील श्री मांडकरी बाल संगीत मेळा व मांडकरी सेवा मंडळ, चौघुले बंधू यांच्या संयुक्त विद्यमाने श्री आई भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ मे रोजी वार्षिक राखण, १६ मे रोजी देवघर शुद्धीकरण, १७ मे रोजी श्री आई भवानी मातेच्या गोंधळा निमित्ताने सायंकाळी जोगवा मागणे, मांड भरणे, महाप्रसाद, श्रींचे दर्शन, नवस बोलणे व फेडणे आदी कार्यक्रमांचे आयोजन कै. गणपत पायाजी चौघुले यांच्या मांडावर करण्यात आले आहे.
१८ मे रोजी सायं.५ वा. जेष्ठ नागरिक, सेवानिवृत्त सदस्य व मयत सदस्यांच्या वारसांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रसंगी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष माजि आमदार परशुराम उपरकर (जीजी) , महासंघाचे समन्वयक चंद्रशेखर उपरकर तसेच गाबीत समाज, महाराष्ट्रचे अध्यक्ष व उद्योजक सुजय धुरत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तर १९ मे रोजी महिला व पुरुषांसह लहान मुलांच्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा व विविध प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम होणार असून, २० मे रोजी सकाळी ११ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायं.सुस्वर भजने व रात्री नृत्यकलाविष्काराच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थितीचे आवाहन श्री मांडकरी बालसंगीत मेळा व श्री मांडकरी सेवा मंडळ, चौघुले बंधू मोंडतर वरचीवाडी यांनी संयुक्तपणे केले आहे.