मालवण | विशेष : मनुष्य जीवनातील अवघड टप्प्यांवर किंवा संघर्षाच्या काळात सावली सारखे सोबत असणे किंवा सावलीही साथीला नसणे असे दोन काळ ‘सावलीशी निगडीत’ वाक्प्रचारांद्वारा व्यक्त केले जातात. तसेच ‘शून्य सावली दिवस’ ही एक गोष्ट सावली या शब्दाशी जोडून आहे.
शून्य सावली दिवस हा शब्द जिज्ञासा निर्माण करतो. या दिवशी वर्षभर सोबत राहणारी कशाचिही सावली काही मिनिटांसाठी त्या व्यक्ती किंवा घटकाला सोडून जाते.
महाराष्ट्रात येत्या ३ ते ३१ मे पर्यंत असे शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहेत.
सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षांतून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. सूर्य आणि पृथ्वी ह्यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते, तिथे शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा तसेच सूर्य दररोज ०.५० अंश सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येते. महाराष्ट्रात तीन ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे तीन मे रोजी तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १५.६ अक्षांश ते धुळे जिल्ह्यात २१.९८ अक्षांश ह्या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे.
एका अक्षांशवर येणाऱ्या सर्व परिसरात त्याच दिवशी शून्य सावली दिवस येतात. महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत, त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे आपण दुपारी बारा ते १२.३५ दरम्यान सूर्य निरीक्षण करावे. समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळय़ा जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल, असे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी समाज माध्यमातून स्पष्ट केले आहे.
३ मे – सावंतवाडी, शिरोडा ,४ मे मालवण, आंबोली,५ मे – देवगड,७ मे – रत्नागिरी,९ मे – चिपळूण,१५ मे -मुंबई, नवी मुंबई,१६ मे – बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर, १७ मे – नालासोपारा, विरार, आसनगांव असे कोकण व मुंबई येथील शून्य सावलीचे वेळापत्रक आहे.
फोटो सौजन्य : गुगल
माहिती संकलन तथा प्रसार स्रोत : श्री किरण वाळके ( मालवण )