कोल्हापूर | क्रिडा विशेष : सध्या भारत देश एकिकडे विविध आपत्तींचा सामना करत असला तरी दुसरीकडे नीरज चोप्रा, भारतीय संघाचा लाॅर्डस् वरील विजय आणि एकूणच क्रिडा क्षेत्रातील आश्वासक जाणिवेच्या लहरीतून जात आहे .
ऑलिंपिक स्पर्धेतील पदक तालिका ही आत्तापर्यंत झालेल्या सर्व ऑलिंपिक स्पर्धांचे विक्रम मोडीत काढून दिमाखात चमकत आहे.
देशाला अस्सल क्रिडा संस्कृतीची ओळख नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करुन दिली जात आहे.
हे सगळं घडताना सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अगदी राष्ट्रीय स्तरावरील एक बातमी आणखीन आनंदीत करुन गेलीय ती म्हणजे पश्चिम विभागीय रायफल शूटींग स्पर्धेत कु.अनुप अरुण गुंजाळ या एका शूटर मुलाने केलेली दुहेरी कामगिरी..!
गुजरात येथे झालेल्या पश्चिम विभागीय रायफल स्पर्धेतील कनिष्ठ गटात अनुपने पाचवा क्रमांक मिळवलाच शिवाय पुरुषांच्या खुल्या गटातदेखील त्याने आठवे स्थान पटकावत राष्ट्रीय विजेतेपदाची त्याची दावेदारी सुनिश्चित केली.
राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेसाठी पात्र झालेल्या अनुपला सर्वप्रथ महेश पाटील यांनी अनुप व त्याच्या पालकांना सल्ला दिला आणि नंतर इंद्रजित व सत्यजित मोहिते बंधूंचे तज्ञ प्रशिक्षण मिळाले.
व्यावसायिक रायफल शूटींगसाठी आवश्यक असलेली एकाग्रता, कुशाग्रता यासाठी शीतल वडेर आणि कल्याणी कुलकर्णी यांनी रेकी व योगाभ्यासाच्या सहाय्याने अनुपला मेंटल कंडिशनिंग तथा मानसिक संतुलन राखायचे धडे व प्रात्यक्षिके दिली.
सध्या अनुप गुंजाळ हा रायफल शूटर व त्याचे कुटुंब कोल्हापूर येथे स्थानिक आहे. त्याचे मूळ गांव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवापूर. या गांव परिसरातून अनेक एथलीट जिल्हा व राज्यस्तरावर चमकले आहेत आणि त्याचाच पुढचा राष्ट्रीय विजेतेपद पात्रतेचा टप्पा अनुपने गाठला आहे.
अनुपचे पालक अरुण गुंजाळ व पल्लवी गुंजाळ यांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीसोबतच क्रिडा संस्कृतीची ओळख घेत अनुपला शूटींग क्षेत्रात विकसीत करायचे ठरवले आणि अनुपने या राष्ट्रीय पात्रता दावेदारीच्या यशाला गवसणी घातली आहे.