देवी केळबाई देऊळ ते देवबाग रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी आंदोलन.
समाजकार्यकर्ते सुरेश बापार्डेकर यांचे नेतृत्व.
मालवण | वैभव माणगांवकर : मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील ग्रामस्थांनी संपूर्ण खड्डेमय रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी आमरण उपोषणाचे आंदोलन छेडले आहे. तारकर्ली येथील हाॅटेल गजानन नजिकच्या रस्त्यावर येथील ग्रामस्थांनी सुरेश बापार्डेकर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी दहा वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली.
वारंवार निवेदने देऊनही ,पर्यटनदृष्ट्या महसूल देणार्या या रस्त्याचे 2006 सालानंतर देवी केळबाई देऊळ ते देवबाग इथपर्यंतचे सलग डांबरीकरणच झालेले नाही म्हणून आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागत असल्याचे सुरेश बापार्डेकर यांनी स्पष्ट केले.
आमदार, खासदार आणि स्थानिक नेत्यांच्या बैठकीनंतरही ही समस्या सुटत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली . स्थानिक लोकांच्या वाहनांच्या डागडुजी वगैरे यासाठीही प्रचंड प्रमाणात खर्च होऊन नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे असे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
गेल्यावर्षीही याच प्रकारचे निवेदन व उपोषण केले होते त्यावेळी आश्वासन मिळाल्याने ते आंदोलन थांबविण्यात आले होते परंतु आता त्या आश्वासनाची पूर्तता होताना दिसत नसल्याने नाईलाजाने या आमरण उपोषणाची पाळी आल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
ठोस अशी कारवाई करुन गणेश चतुर्थीपूर्वी कामाची व काँक्रिटीकरणाची हमी न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र होईल असे स्थानिकांनी सांगितले.
श्री बापार्डेकर यांच्यासोबत वैभव सावंत ,महेंद्र चव्हाण आणि इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित आहेत.