मालवण | संपादकीय : काल राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर केले . यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका पंचायत समितीला वर्ष 2022 साठीचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण हा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाला आहे. पंचायत समितीला पुरस्कार प्राप्त होताना रुपये पंचवीस लाखाचा निधी पुरस्कार तथा बक्षिस स्वरुप देण्यात येणार आहेत.
ग्रामीण स्तरावर काम करताना पंचायत समिती ह्या प्रणालीला अगदी मूलभूत घटकांच्या नोंदी व सर्वेक्षण करुन त्यांवर रचनात्मक काम करणे यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आवश्यक असते. सार्वजनिक मालमत्तेचे उचित् वितरण आणि ग्रामीण स्तरावरील विविध योजनांचा आणि सेवांचा लाभ नागरीकांपर्यंत रचनात्मक रित्या पोहोचेल असे नियोजन करावे लागते. पिण्याचे पाणी , पथदीप तथा स्ट्रीट लाईट, नैसर्गिक साधनांची उपलब्धता व संवर्धन, वरीष्ठ नागरीक, अनुसूचीत जाती जमातींसाठी सेवा, समाजातील दुर्बल घटकांसाठीच्या योजना , समाज सामूहिक संघटन, रोजगार उपलब्धता, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामपंचायतीला प्रोत्साहन देऊ शकतील अशा घटक,व्यक्ती व संस्थांशी संलग्नता अशा विविध स्तरांवर नागरीकांसाठी खूप सामान्य वाटणार्या परंतु प्रत्यक्षात मूलभूत असणार्या गरजांवर अथक व नाविन्यपूर्ण पद्धतीने काम करणे असे या पुरस्काराचे निकष असतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील दुर्गम व दुर्लक्षित क्षेत्र आज फार कमी भासत असतील तर कदाचित त्याचे कारण पंचायत समितीने दाखवलेली प्रशासकीय व राजकीय इच्छाशक्ती म्हणता येईल. हा पुरस्कार शब्द ‘सोहळा किंवा झगमगाट’ असा भासूही शकतो परंतु प्रत्यक्षात ज्या मुलभूत गोष्टींच्या व घटकांच्या प्रयत्नांसाठी तो मिळाला आहे त्या घटकांची प्रणाली चालूच रहाणे यासाठी तो पुरस्कार आहे. पंचायत समिती मालवण किंवा कुठल्याच पंचायत समितीला मिळणारा असा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार हा ‘जीवन गौरव पुरस्कार’ समजून समाधानी व्हायचा मुक्काम नसून तो एका नव्या जबाबदार राजकीय व प्रशासकीय प्रवासासाठी इंधन आहे.
इ गव्हरनंन्स द्वारा आता नोंदी , विकास योजना सादरीकरण, कामांवर लक्ष ठेवणे या गोष्टी साधने आहेत…त्या साध्य नक्कीच नाहीत. ग्रामीण भागातील नागरीकांना दळण वळणासाठी मिळतील तितक्या सुविधा कमीच पडतील अशी भौगोलिक स्थिती आहे. भविष्यात भूजल पातळी व शालेय आणि व्यवसाय शिक्षण यावरही लक्ष ठेवूनच रहावे लागेल.
मालवण पंचायत समिती अध्यक्ष श्री अजिंक्य पाताडे आणि उपाध्यक्ष श्री सतिश परुळेकर व सहकारी यांची नागरीकांप्रती राजकीय इच्छाशक्ती सिद्ध झाली आहे परंतु ती सिद्धता हे या पुरस्काराचे ध्येय नसेल याची त्यांनाही कल्पना असेलच.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री जयेंद्र जाधव आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री जयेंद्र पराडकर व टीम यांची प्रशंसा होत असतानाच आता त्यांच्या कार्यपद्धतीकडून ग्रामीण भागातील जनतेच्या अपेक्षा वाढणार आहेत.
सद्यस्थितीत मालवण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींशी संवाद वाढविण्याचे काम सभापती अजिंक्य पाताडे यांनी नाविन्यपूर्ण पद्धतीने केले आणि त्याचे छोटे छोटे निकाल येत एका नवीन ग्रामीण रचनात्मक प्रगतीची सुरवात होत आहे असे म्हणावे लागेल….’विकासाची नाही तर प्रगतीची..!’
कारण विकास ही भावना कदाचित् इच्छाशक्तीला मुक्काम देईल पण प्रगतीची भावना तिच्या अस्तित्वासाठी ‘पथ’ शोधतच राहील.
पुरस्कार प्राप्त पंचायत समितीतील सर्वांनीच अथक इच्छाशक्ती दाखवल्याने हा पुरस्कार मिळालाय त्याची सर्वच स्तरांतून निखळ प्रशंसा होणे ही सुद्धा गरजच आहे..खासकरुन शहरी क्षेत्रातूनही ते अभिनंदन व्हावे.
अभिनंदनामागे आनंदाची भावना अपेक्षित आहे. गर्व गाफिल ठेवू शकतो याची अनेक उदाहरणे आता राजकीय व प्रशासकीय तत्वांच्या गाठीशी आहेतच.
आजही देश “ग्रामीण घटकांवरच” जगतोय व तो तसाच जगला तर देश सक्षम असेल. त्यामुळे त्यांसाठी कार्यरत असलेल्या व त्यावर अंकुश राखणार्या सर्वच प्रणालीचे अभिनंदन.
तालुक्याचा प्रथम नागरीक असणे हा वास्तवातही खाचखळगे व दगडांचा प्रवास असतो..त्यासाठी स्वयंस्वास्थ्य आवश्यक असते…त्या स्वस्थ व व्यस्त प्रवासासाठीही सभापती अजिंक्य पाताडे यांना शुभेच्छा.
संपादक | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल
अभिनंदन मालवण पंचायत समिती