न्यायप्रविष्ट मुद्द्यामुळे गावात आहे १४४ कलम लागू..
चौके | अमोल गोसावी : कोरोनामुळे सलग दोन वर्षे सर्व सार्वजनिक उत्सवांवर असलेले निर्बंध प्रशासनाने यावर्षी उठवल्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि देशभरातही आज श्री रामजन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा होत आहे.
परंतु मालवण तालुक्यातील ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध असलेल्या धामापूर तलावाशेजारी असलेल्या नवसाला पावणाऱ्या श्री देवी भगवती मंदिरात मात्र यावर्षीही पारंपरिक रामजन्मोत्सव साजरा झाला नाही. तसेच मंदिराला कुलूप असल्याने देवी भगवतीची पूजाही झाली नाही. श्री रामनवमीसाठी गावाबाहेरुन आलेल्या शेकडो भाविकांना बाहेरूनच देवीचे दर्शन घेऊन निराश मनाने माघारी परतावे लागले. या सर्व परिस्थितीला कारणीभूत ठरला आहे. देवस्थानावरुन गावकऱ्यांमध्ये अंतर्गत वाद सुरु आहे.
कोरोना काळातील दोन वर्षे मंदिरातील उत्सवांना बंदी असली तरी देवीची नित्यपूजा मात्र नियमितपणे होत होती. परंतु यावर्षीच्या महाशिवरात्र उत्सवादरम्यान गावातील दोन गटांमधील वाद अधिक चिघळला त्यामुळे पोलीसांना हस्तक्षेप करावा लागला. सध्या हा विषय न्यायप्रविष्ट असून.महाशिवरात्री पासून मंदिर मात्र कुलूपबंद करण्यात आले आहे आणि संपूर्ण धामापूर गावामध्ये उत्सवादरम्यान १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
या सर्वाचा परिणाम मात्र श्री देवी भगवती मंदिरात वर्षातील सर्वात मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या रामनवमी उत्सवावर झाला आहे. गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत मंदिरात नियमित होणारे कार्यक्रम आणि उत्सव यावर्षी मात्र गावकऱ्यांमधील वादामुळे बंद झालेले दिसून येतात. त्याचप्रमाणे मंदिराला कुलूप असल्याने देवीची नित्यपूजाही बंद आहे. आजही रामनवमी असेल या अपेक्षेने शेकडो भाविक तसेच पर्यटक भगवती मंदिरात येत होते पण मंदिराला असलेले कुलूप आणि पोलीस बंदोबस्त यामुळे सर्वांना फक्त बाहेरूनच देवीला नमस्कार करून परतावे लागत होते. पण जाताना मात्र प्रत्येक भाविक या सर्व प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत आणि येथील सद्य स्थितीला दोष देत माघारी जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर यावर्षीही पुर्वीप्रमाणेच हजारो भाविकांच्या उपस्थितीत ऐतिहासिक श्री देवी भगवती मंदिरात रामजन्मोत्सव साजरा होईल अशी भाविकांची अपेक्षा होती. परंतु दोन गटातील वादाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मात्र प्रभू श्रीराम नामाचा जयघोष न दुमदुमता फक्त शुकशुकाट पसरला होता आणि आशेने येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांचा मात्र हिरमोड होत होता. त्यामुळे पुन्हा एकदा गावातील दोन्ही गटांनी तसेच गावकऱ्यांनी या विषयावर सामंजस्याने तोडगा काढावा आणि योग्य निर्णय घ्यावा जेणेकरुन श्रद्धेने देवीच्या भेटीला येणाऱ्या प्रत्येक भाविकास निराश होऊन माघारी परतावे लागू नये अशी इच्छाही काही भाविकांनी यावेळी व्यक्त केली.
रामनवमी दिवशी गजबजणारा भगवती मंदिर परिसर यावर्षी मात्र शांत होता. दोन गटातील वादाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात पोलीस बंदोबस्तही होता.
मंदिराला कुलूप असल्याने श्रद्धेने येणारे भावीक लोखंडी दरवाजालाच हार घालून आणि बाहेरून ओटी भरून जात आहेत.