नगरसेवक ऍड. विराज भोसले व नगरसेवक उर्वी जाधव यांच्या पाठपुराव्याला यश..!
1 कोटी 42 लाख 28 हजार च्या निधीची विकासकामे लागणार मार्गी..!
कणकवली | प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपायोजना याअंतर्गत कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत आम्ही सातत्याने पाठपुरावा केल्याने 1 कोटी 42 लाख 28 हजार च्या दलीतवस्ती (अनुसूचित जाती उपायोजना) विकास कामांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. गेल्या दोन वर्षात ही कामे कोविड मुळे रखडलेली असताना नगरपंचायत चे नगरसेवक ऍड. विराज भोसले व नगरसेवक उर्वी जाधव यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याला यश आले असून, या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने लवकरच ही कामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कणकवली उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.
कणकवली नगरपंचायत सत्ताधारी नगरसेवकांच्या माध्यमातून 18 डिसेंबर 2020 व 24 ऑगस्ट 2021 च्या सर्वसाधारण सभेत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विकास कामे मंजुरी करण्यासंदर्भात कामे सुचवून ठराव घेतला होता. त्यानुसार कामांचे प्रस्ताव पाठविण्यात आले व त्या प्रारुप आराखड्याला मंजुरी मिळाली. त्यानंतर परिपूर्ण प्रस्ताव नगरपंचायत च्या माध्यमातून पाठविण्यात आल्याचे श्री हर्णे यांनी सांगितले. या मंजूर कामांमध्ये नवबौद्ध स्मशानभूमी नूतनीकरण करणे 51 लाख 55 हजार, सिद्धार्थ नगर येथील अंगणवाडी बांधकाम करणे 13 लाख 86 हजार, सिद्धार्थनगर आंबेडकर भवन जवळ सभामंडप व व्यासपीठ बांधणे 42 लाख 37 हजार, पराष्ट्येकर घराशेजारील गटारावर स्लॅब टाकणे 5 लाख 65 हजार, बौद्ध मंदिर फूटपाथ नूतनीकरण करणे 6 लाख 82 हजार, मनोज कांबळे घराशेजारी सार्वजनिक विहिर बांधकाम करणे 11 लाख 66 हजार, बौद्धवाडी भाई जाधव घराशेजारील कॉंक्रीट गटारावर स्लॅब टाकणे 5 लाख 19 हजार, मनोज कांबळे ते अरुण जाधव घर काँक्रीट गटार बांधणे 5 लाख 18 हजार अशी एकूण 1 कोटी 42 लाख 28 हजार यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यातील प्रामुख्याने सोनगेवाडी मधील पराष्ट्येकर घराशेजारील गटारावर स्लॅब टाकणे हे 5 लाख 65 हजार व बौद्ध मंदिर फुटपाथ नूतनीकरण करणे हे 6 लाख 82 हजार च्या कामा करिता नगरसेवक ऍड. विराज भोसले यांनी विशेष पाठपुरावा केला होता. तर उर्वरित कामांकरिता उर्वी जाधव यांनीही पाठपुरावा केला. मुळात ही सर्व कामे नगरपंचायत चे सत्ताधारी म्हणून आमच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेली असताना विरोधी नगरसेवकांकडून केवळ श्रेय घेण्यासाठी पत्रकार परिषद घेतली जात निधी मंजुरीचे दावे केले जाउ शकतात. मात्र वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहचावी व कामे कुणी मंजूर केली या प्रक्रियेची माहिती जनतेला व्हावी याकरिता ही माहिती देण्यात आली असे श्री हर्णे यांनी सांगितले.