पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे यांची मालवण भेट ठरली पर्यटन वाढीसाठी फायद्याची..
मालवण नगरपरिषद, नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक यांचे अथक प्रयत्न झाले यशस्वी..
मालवणातील स्थानिकांचे वाढणार रोजगार .!
मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री तथा शिवसेना युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांनी आपल्या मालवण भेटी नंतर मालवण नगरपरिषदेने प्रस्ताव ठेवलेल्या मत्स्यालयासाठी 25 कोटी रुपये मंजूर केल्या बद्दल त्यांचे मालवण वासीयांच्या वतीने मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे जाहीर आभार मानले आहेत.
मालवण शहर हे पर्यटन दृष्ट्या विकसनशील आहे आणि हे शहर पर्यटनाबाबत अग्रेसर होण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर आणि शिवसेना नगरसेवकांनी 2016 साली सत्तेत आल्यापासून भरपूर प्रयत्न केले होते. कोट्यावधी रुपयांची विकासकामे प्रस्तावित करत असताना पर्यटनाच्या दृष्टीने मालवण मध्ये चांगल्या प्रकारचा मत्स्यालयाचा प्रस्ताव सादर करणे बाबत आमदार वैभव नाईक यांनी सूचना केली होती. त्यानुसार 2020 मध्ये मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या मालवण भेटीच्या वेळी त्यांना मालवण नगरपरिषदेच्या वतीने मत्स्यालयाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे , नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडेही प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानंतर खासदार विनायक राऊत मा. पालकमंत्री उदय सामंत साहेब,आमदार वैभव नाईक या सर्वांनी याबाबत पाठपुरावा करून हा प्रकल्प मंजूर करण्यात महत्वाचे योगदान दिले आहे.या मत्स्यालय प्रकल्पामुळे मालवणच्या पर्यटनात नक्कीच एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पर्यटक संख्या वाढी बरोबरच मालवणच्या व्यापारात पण वृद्धी होणार आहे. मालवण रेवतळा याठिकाणी हे मत्स्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे रॉक गार्डन याठिकाणी ज्या प्रमाणे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली त्याप्रमाणे याठिकाणी पण स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे अशी माहिती मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी माध्यमांना प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.
या प्रसिद्धीपत्रात मालवणचे माजी नगराध्यक्ष व शिवसेनचे श्री.महेश कांदळगांवकर यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे मालवण नगर परिषद, शिवसेना पक्ष आणि समस्त मालवण वासीयांच्या वतीने जाहीर आभार मानले आहेत.