बांदा | राकेश परब : प्रोऍक्टिव्ह अबॅकस कोल्हापूर आयोजित ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत येथील एकलव्य अबॅकस क्लासच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या क्लासच्या १३ विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करून यशाचा आलेख कायम ठेवला आहे. चार मिनिटांमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार यांची १०० गणिते अबॅकसच्या सहाय्याने सोडून एकलव्य अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आली. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तब्बल चार हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. क्लासच्या अनन्या अमोल कोळी, वेद सचिन मुळीक, तन्मय दिलीप शितोळे, दिनेश कृष्णा राऊळ या विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गणिते अचूक सोडून प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला.
दीक्षा राजेश गोडकर, संस्कार महेश शिरोडकर, संजना बापू पवार यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. युग्धा दीपक बांदेकर, तनिष्का दीपक पंडित, अविष्कर राजेश हळदणकर, अनन्या संजय सावंत, दुर्वा दत्ताराम नाटेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
सलग सातव्या वर्षी एकलव्य अबॅकस क्लासच्या संचालिका सौ स्नेहा केसरकर-पावसकर यांनीही अबॅकस मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड”चे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अबॅकस स्पर्धेच्या द्वितीय फेरीसाठी या क्लासचे बारा विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
इस्लामपूर येथे एकता अबॅकसतर्फे आयोजित अबॅकस स्पर्धेत अविष्कार राजेश हळदणकर याने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर मयुरेश रमेश पवार आणि युग्धा दीपक बांदेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्लासच्या संचालिका स्नेहा केसरकर-पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले.