आज काम बंद आंदोलन…!
वैभववाडी | नवलराज काळे : तालुक्यातील करुळ डोणा धनगरवाडी येथील धरणग्रस्तांना भूसंपादनाचा मोबदला न देता धरणाचे काम सुरु आहे.या विरोधात जमीनमालक व शेतकरी आक्रमक झाले आहेत. १९ मार्चपासून धरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा डोणा धनगरवाडी ग्रामस्थ विकास मंडळ करुळ यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
करुळ डोणा येथे लघुपाटबंधारे विभागाच्यावतीने धरण बांधले जात आहे.मात्र काम सुरू होऊन सात वर्षे होत आली तरी शेतकऱ्यांना जमीन मोबदला दिला नाही. यावरून शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक झाले असून मोबदला मिळेपर्यंत धरणाचे काम बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात लेखी निवेदन जिल्हाधिकारी व संबंधित विभागाला दिले आहे. या निवेदनात म्हटलं आहे, धरण बांधताना लघु पाटबंधारे विभागाने कायदेशीरपणे भूसंपादन न करता नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलून गावातील शेतकऱ्यांच्या शेती, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच भूसंपादन प्रस्ताव क्र.६/२०१३ चे संयुक्त मोजणीपञकात नदीचे पाञ बदलेला मार्ग हा संयुक्त मोजणी पञात नोंद करण्यात आलेला नाही.त्यामुळे सदरचे भूसंपादन हे बेकायदेशीर आहे.बेकायदेशीर नदीचा प्रवाह बदल्यामुळे वाडीतील घरांना धोका निर्माण झाला आहे.तसेच धरणबांधकामाचा भराव टाकला आहे.ती शेतजमीन होती.माञ सात आठ वर्षे होऊनही त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.त्यामुळे सदर जमिनमालक शेतकऱ्यांवर गाव सोडून बाहेरच्या गावात मोलमजूरीसाठी जावे लागले आहे.
कायदेशीर भूसंपादन करुन बाधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व त्यानंतर कामाला सुरुवात करावी अशी मागणी करुनही सात आठ वर्षात भूसंपादन करुन मोबदला देण्यात आलेला नाही.तसेच दांडगाईने फेब्रुवारी महिन्यापासून काम सुरु करण्यात आले आहे.
धरणासाठी आवश्यक जमिनीचे रितसर भूसंपादन करुन नुकसान भरपाई देण्यात यावी.तसेच वस्ती पर्यंतचा रस्ता करुन पुल, मो-या, संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करावे.बदलेल्या नदी प्रवाहाच्या दोन्हीही बाजूने संरक्षक भिंत बांधणे. बाधीत शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला दयावा. वरील मागण्यांची पूर्तता झाली नाही,तर १९ मार्चपासून काम बंद पाडण्याचा इशारा डोणा धनगरवाडी ग्रामस्थ विकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गुरखे,सचिव आकाराम गुरखे, खजिनदार धोंडू गुरखे यांनी दिला आहे.
धरणाचे काम करीत असताना धरणाच्या भिंतीमध्ये मोठमोठे दगड टाकले आहेत.हे काम दर्जाहीन झाले आहे.त्यामुळे भविष्यात धरण फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे या कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.अशी मागणी ग्रामस्थांनी आहे.