बांदा | राकेश परब : मडुरा – परबवाडी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून गव्यांच्या कळपाचा अक्षरशः हैदोस सुरु आहे. मिरची, नाचणी, भूईमुग , चवळी या रब्बी पिकांसह वायंगणी भातशेतीचेही अतोनात नुकसान करण्यात आले आहे. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी अरुण परब यांनी केली आहे. मडुरा गावात रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते . मात्र गेल्या काही वर्षांपासून रानटी प्राण्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. वनविभागाकडून पंचनामे करण्यात चालढकल केली जात असल्याने शेकडो शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत .
याबाबत शेतकरी अरुण परब यांनी वनविभागाच्या गलथान कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर यांच्याकडे त्यांनी शेतकर्यांची कैफियत मांडली. नुकसान भरपाई, पंचनामे करण्यापेक्षा गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा अशी मागणी त्यांनी फोनवरुन केली. वनक्षेत्रपाल क्षीरसागर यांनी पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.