मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील त्रिंबक गावामध्ये बीएसएनएल रेंज व्यवस्थित मिळत नसल्याने सरपंच विलास त्रिंबककर यांच्या सह ग्रामस्थांनी बीएसएनएलच्या सावंतवाडी कार्यालयात धडक देत रेंज अभावी होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे.
येत्या आठवड्यात प्रत्यक्ष इंजिनियरना पाठवून सर्व्हे करण्यात येईल व रेंजची समस्या सोडविण्याचा आवश्यक तो प्रयत्न केला जाईल असे आश्वासन यावेळी बीएसएनएल अधिकाऱ्यांनी दिले.
सध्या मुलांना ऑनलाइन शिक्षण, रेशनिंग, पोस्ट, तसेच इतर ऑनलाइन सेवा मिळण्यासाठी थ्री जी सेवा अत्यावश्यक आहे. रेंज अभावी येथील मोबाइल धारकांना गैरसोईचा सामना करावा लागतो.
ही समस्या दुर व्हावी या उद्देशाने सरपंच त्रिंबककर यांच्या सह अर्चित लेले,किशोर त्रिंबककर,कमलाकांत बापट, दिगंबर वर्देकर,सुधीर त्रिंबककर,कमलाकर सावंत इ .ग्रामस्थानी मालवण व सावंतवाडी येथे बी. एस.एन.एल.च्या कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या अडचणींचे निवेदन सादर केले होते.