सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घटना..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे डांगमोडे येथील मोठा वरचा सडा आकेरी ब्राह्मण स्थळा नजीकच पाच दिवसांपूर्वी एका विशाल जुन्या वडाच्या झाडाच्या लगत सुमारे सव्वा ते दीड फूट उंचीची धातूची शेषधारी पिंडी ग्रामस्थांना आढळून आली आहे. डांगमोडे वरचा सडा येथे जंगलमय भागामध्ये आग लागली होती. याच ठिकाणी डांगमोडे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले आकेरी ब्राह्मणाचे देवस्थान असून याठिकाणी येथील ग्रामस्थ सार्वजनिक ब्राह्मणभोजन साजरे करतात.
पाच दिवसांपूर्वी जेव्हा येथील ग्रामस्थ ब्राह्मणभोजन करण्यासाठी या ठिकाणी गेले असता एका जुन्या वडाच्या झाडाच्या मध्ये ही पुरातन पिंडी या ग्रामस्थांना दिसून आली. गुरुवारी दहा मार्च रोजी डांगमोडे गावातील ग्रामस्थ या पिंडीची विधिवत प्रतिष्ठापना करणार असल्याची माहिती समोर येत असून इतिहास संशोधकांनी या पिंडी ची पाहणी करण्याचीही मागणी होत आहे.
डांगमोडे गावातून घाटी रस्ता चालत साडे तीन किलोमीटर तसेच मसुरे पोलीस दूरक्षेत्रच्या समोरील डोंगरावरून चालत सुमारे चार किलोमीटर अंतरावर ही पुरातन पिंडी आढळली आहे.