वाघेश्वर तोंडवळी संघ ठरला उपविजेता..!
मालवण स्पोर्टस् क्लबतर्फे आयोजीत लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेची यशस्वी सांगता.
मालवण | सहिष्णू पंडित : मालवण स्पोर्टस् क्लबतर्फे आयोजीत चौथ्या एम.पि.एल.लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेत ‘प्रीतम गावडे इलेव्हन’ (चौके) संघाने विजेतेपद मिळविले.
टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राउंडवर झालेल्या आजच्या या अंतिम सामन्यात वाघेश्वर तोंडवळी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले.
प्रीतम गावडे इलेव्हन संघाचा कर्णधार विशाल लुडबे आणि स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू विठ्ठल कवटकर यांच्या मजबूत भागिदारीमुळे संघ दिडशे धावांचा टप्पा सहज पार करेल अशी स्थिती होती परंतु विशाल लुडबे आणि विठ्ठलचा ताळमेळ मिसफिल्डिंगवर एक धाव घेताना थोडासा चुकला व विशाल धावबाद झाला.
पाठोपाठ दुसर्या षटकांत विठ्ठलही धावचित झाला.
तरीही संघाने वाघेश्वर तोंडवळी संघाला 138 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दिले.
वाघेश्वर तोंडवळी संघाची सुरवात निराशाजनक झाली व सलामीवीर कुणाल बिरमोळेला भोपळाही फोडता आला नाही. या धक्क्यातून वाघेश्वर तोंडवळी संघाला संपूर्ण सामन्यात नीटसे सावरता आले नाही.
मध्यफळीतील अनुभवी पण जखमी असलेल्या अमेय मांजरेकर व सचिनने संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढायचा प्रयत्न केला परंतु प्रीतम गावडेच्या गोलंदाज व क्षेत्ररक्षकांनी सामन्यावरील पकड ढिली पडू दिली नाही.
अंतिम सामन्यातील सामनावीर विठ्ठल कवटकर हाच मालिकावीर देखील ठरला.
अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज सागर वाईरकरची टिच्चून केलेला मारा हे दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.
वाघेश्वर तोंडवळीचा संपूर्ण संघ 20 व्या षटकात 102 धावात गारद झाला.
प्रीतम गावडे इलेव्हन संघाने तब्बल 35 धावांनी वाघेश्वर तोंडवळी संघाचा पराभव करुन चौथ्या एम.पी.एल.चषकावर दिमाखात नांव कोरले.
अंतिम सामन्यात पंच म्हणून सिंधुदुर्ग पंच क्रिकेट असोसिएशनचे उमेश मांजरेकर व मंगेश धुरी यांनी कामगिरी बजावली.
मंदार आजगांवकर,रोहन कदम यांनी समालोचनाने बहार आणली तर पत्रकार व खेळाडू महेंद्र पराडकर यांनीही विशेष समालोचनातून उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली. झुब क्रिएटीव्ह स्टुडिओचे ज़ुबेर ख़ान आणि वैभव माणगांवकर यांनी सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाची जबाबदारी सांभाळली.
बक्षिस वितरण सोहळा.
टोपिवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राउंडवरील उभारलेल्या विशेष मंचावर मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर,डाॅ.राहुल पंतवालावलकर,ज्येष्ठ क्रिकेटर व माजी अध्यक्ष बबन रेडकर,पत्रकार अमित खोत, माजी खेळाडू ॲम्ब्रोज आल्मेडा,रिझवान शेख,संघमालक प्रितम गावडे व गणेश तोंडवळकर,मालवण स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष सौरभ ताम्हणकर,मार्गदर्शक अमित हर्डीकर, फ्रान्सिस फर्नांडिस,निशय पालेकर,ज्ञानेश केळुस्कर,प्रशिक्षक व खेळाडू सुशील शेडगे, संदीप पेडणेकर, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे संस्थापक व मुख्य संपादक सुयोग पंडित ,सहसंपादक सहिष्णू पंडित आणि क्रिडा व सामाजिक क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.
बोर्डिंग ग्राउंडचे पदाधिकारी व तारकर्ली क्रिकेट क्लबचे गोविंद ऊर्फ बंटी यांचीही अंतिम सामन्याला विशेष उपस्थिती होती.
ही स्पर्धा गेले आठ दिवस चालली.
प्रीतम गावडे इलेव्हन संघाला विजेतेपदाचा चषक व रुपये 55,555 आणि वाघेश्वर तोंडवळी संघाला उपविजेतेपदाचा चषक व रुपये 33,333 बक्षिस स्वरुपात वितरित करण्यात आले.
तसेच चिवला बीच येथील व्यावसायिक कमलेश मयेकर यांच्या मार्फत अंतिम सामन्यातील षटकारासाठी विठ्ठल कवटकर याला विशेष बक्षिस वितरित करण्यात आले.
मालवण स्पोर्टस् क्लबतर्फे आयोजीत या लेदरबाॅल स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रचंड मेहनत घेतलेले क्लबचे अध्यक्ष सौरभ ताम्हणकर, गौरव लुडबे, फ्रान्सीस फर्नांडिस,ज्ञानेश केळुस्कर, टायटस फर्नांडिस,राहुल परुळेकर,निशय पालेकर,नितीन कानसे,संदीप पार्टे,एज़ाज मुल्ला,डॅनीस फर्नांडिस,रुपेश करलकर,विल्सन फर्नांडिस,जॅकी परेरा,रोहीत चव्हाण आणि मार्गदर्शक अमित हर्डीकर यांच्या उत्तम लेदरबाॅल स्पर्धा आयोजनाबद्दल त्यांची व संपूर्ण मालवण क्रिकेट क्लबची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.