विशाखा पुरस्कार प्राप्त कवी मोहन कुंभार होते कविसंमेलन अध्यक्ष..!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सुखासीन जगणाऱ्या माणसाच्या ओठांवर कधी कविता येत नाही. आलीच तर ती खोटी ठरते. जगण्याने छळले तर कवितेचे शब्द धारदार होतात. दिशा पिंकी शेख यांची कविता आपल्याला अंतर्बाह्य ढवळून काढून विचार करायला लावते. अस्सल जगणं अनुभवणाऱ्या संवेदनशील मनातूनच अस्सल कविता लिहिली जाते, असे प्रतिप्रादन कवी प्रा. मोहन कुंभार यांनी केले. सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान, कणकवली आयोजित सरस्वती लक्ष्मण पवार काव्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात रंगलेल्या कविसम्मेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
“झुलतो मी आत आत
फुलतो मी आतल्या आत
मी मला रुजवून घेतो
मनाच्याही आत आत”..
अशी संवेदनशील अभिव्यक्ती असलेले विशाखा पुरस्कार प्राप्त कवी प्रा. मोहन कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली आणि काव्य पुरस्कार विजेती कवयित्री दिशा पिंकी शेख हिच्या प्रमुख उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या कविसम्मेलनात जिल्ह्यभरातील कवींनी उपस्थिती दर्शवून आपापल्या दर्जेदार रचना सादर केल्या. कवी सिद्धार्थ तांबे, श्रेयश शिंदे, कवयित्री कल्पना बांदेकर, कल्पना मलये, मनीषा पाटील, सरिता पवार, चेतन बोडेकर, सुरेश पवार, मधुकर जाधव, मनोहर सरमळकर, श्रीराम चव्हाण, रिमा भोसले, उदय सर्पे, राजेंद्र गोसावी, दिलीप चव्हाण, स्नेहा राणे, साक्षी हर्णे इ. अनेक कवींनी आपल्या स्वरचित रचना सादर केल्या. उपस्थित काव्य रसिकांचाही कवींच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
काव्य पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले साहित्य अकादमी प्राप्त ज्येष्ठ लेखक ‘उचल्या’ कार लक्ष्मण गायकवाड यांनी शेवटपर्यंत उपस्थित राहून कवींना प्रोत्साहित केले. या कवीसम्मेलनाचे यथोचित असे सूत्रसंचालन प्रा. मनीषा पाटील यांनी केले. तर कवी सुरेश पवार यांनी आभार मानले.