खवय्यांची स्पर्धा म्हणून जिल्ह्यात नावलौकिक..!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील समाजशील अशा श्री. सुजीत जाधव मित्रमंडळ व गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित कै. रणजित पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा १० मार्च ते १२ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. बॉक्स अंडर आर्म स्वरूपाची असलेली ही स्पर्धा खवय्यांची स्पर्धा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.
आपल्यातून अचानक निघून गेलेल्या मित्राच्या आठवणी जपण्यासाठी सुजीत जाधव मित्रमंडळ व गांगेश्वर मित्रमंडळ यांच्या वतीने गेली अनेक वर्षे सातत्याने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १५ हजार ११ व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक ८ हजार ११ व आकर्षक चषक तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम व आकर्षक चषक ठेवण्यात आले आहेत. त्यासोबत मालिकावीर, उगवता खेळाडू, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांसाठी रोख रक्कम व आकर्षक चषक ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत प्रत्येक षटकार चौकार व विकेट यासाठी खेळाडूंना उकडलेली अंडी पुरस्कृत केली जातात.
कै. रणजित पाटील हा अतिशय गुणी व दानशूर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सुजीत जाधव मित्रमंडळ व गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेतील उर्वरित रक्कम ही गरजू कुटुंबासाठी दिली जाते. त्यासोबत आपत्कालीन निधी म्हणून काही रक्कम या मंडळामार्फत दिली जाते. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या ३२ संघांना प्राधान्य देण्यात येणार असून इच्छुक संघांनी चाणी जाधव ८२०८४५२२६६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सुजीत जाधव मित्रमंडळ व गांगेश्वर मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे