(विशेष )
मालवण | सुयोग पंडित / चिंदर विवेक परब (विशेष) : नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणासाठी पदर प्रतिष्ठानची स्थापना झाली आहे.
कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे हे त्याचे संस्थापक आहेत. तो संपूर्ण प्रकल्प जिल्ह्यातील महिलांना एका सशक्त अस्तित्वाचा सकार देईल असाच प्रतिष्ठानचा उल्लेख असल्याचे पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मेघा गांगण यांनी त्यांच्या मनोगताद्वारे सांगितले आहे.
याच दरम्यान महाराष्ट्र, कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक अशी वार्ता आली की ज्यामुळे केवळ मराठी महिलेचा म्हणण्यापेक्षा एका मराठी व्यक्तिचा राष्ट्रीय स्तरावर मोठा गौरव झालेला आहे.
ती व्यक्ती आहेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.संजना सावंत.
पदर प्रतिष्ठानची बिजं कणकवलीतच पेरली जातायत आणि सौ.संजना सावंत याही कणकवलीच्याच, हाही एक स्थळयोग फार काही सांगून जातोय.
गेल्या पाच वर्षातील सौ.संजना सावंत यांचा राजकारणातील सक्रीय वावर हा विविध स्तरांवर किंवा समाजाच्या विविध पदरांमधून होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक,सांस्कृतिक,वैचारिक उपक्रमांतील त्यांचा सहभाग हा लक्षणीय आहेच शिवाय त्यांची पक्षभेद विरहीत अशा आरोग्यविषयक उपक्रमांची आखणी व संपन्नता हा निश्चितपणे अभ्यासपूर्ण अशा खंबीर नेतृत्वाची चुणुक दाखवून जातो.
सामाजिक स्तरावर काम करताना व विशेषतः आरोग्यविषयक जाणीवांमध्ये तर संवेदनेला वस्तुनिष्ठतेची जोड देणे हे कसब असते. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांचे ते कसब सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण स्तरांत जास्त प्रभावीपणे पोहोचणे ही एक आव्हानात्मक स्थिती म्हणजे कोरोनाकाळ होता. हे सर्व सांभाळताना इतर खात्यातील उपक्रमांची पूर्तता हेही राजकीय व सामाजिक दिव्यच..!
या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना जो राष्ट्रीय पुरस्कार मिळतोय तो राजकारण व समाजकारण यांतील दृष्टीला कृतीच्या नित्यक्रमाला मिळालेली प्रभावशाली दखल वंदनाच म्हणता येईल.
नवी दिल्ली येथील डॉ.विशाखा साेशल वेल्फेअर फांऊडेशनतर्फे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना संदेश सावंत यांना राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट महिला २०२२ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर ९ मार्च २०२२ रोजी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
मिझोरामचे माजी राज्यपाल अमोलक रत्तन कोहली यांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
तर या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक, केंद्रीय मंत्री भारती पवार, केंद्रीय बाल कल्याण विभागाचे चेअरमन प्रियांक कानूगो तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रांना व खासकरुन शासकीय व प्रशासकीय कार्यप्रणालीला नियमीत कार्यसंपन्नतेची संजीवनी देणाराच हा पुरस्कार आहे असे म्हणणे वावगं ठरणार नाही. सौ.संजना सावंत यांचा हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेतृत्वक्षमतेची इच्छा बाळगणार्यांसाठीही एक स्फूर्ती ठरेल.