मालवण / प्रतिनिधी : मालवण येथील बॅ नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर च्यावतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता संस्थेच्या दादा शिखरे सभागृहात सुप्रसिद्ध मालवणी कवि श्री. दादा मडकईकर आणि श्री. रुजारिओ पिंटो यांच्या बहारदार मालवणी कविता सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.दादा मडकईकर यांनी त्यांच्या शैलीत अनेक कविता सादर केल्या.दादांनी आपल्या गात्या गळ्याने साध्या साध्या प्रसंगातून सुचलेल्या कविता गाजलेल्या व लोकप्रिय गीतांच्या चालीत कशा बसविल्या ते उलगडून सांगितले. खेडेगाव,जत्रा, पाठ्यपुस्तकातील कविता सादर केल्या.रसिक श्रोत्यांनी हशा, टाळ्यांच्या स्वरुपात भरभरून प्रतिसाद दिला.श्री. रुजारिओ पिंटो यांनी आपल्या कवितांमधून कोकणातला निसर्ग, प्रासंगिक राजकिय विडंबनात्मक प्रेमकविता सादर केल्या.स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर कविता सादर केली.फातर ही पुरस्कार विजेती स्त्रीची व्यथा मांडणारी कोंकणी कविता रसिकांच्या काळजाचा ठाव घेऊन गेली.
कार्यक्रमाची सुरुवात साने गुरूजी यांच्या खरा धर्म या प्रार्थनेने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज,बॅ.नाथ पै,साने गुरूजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.दोन्ही कविंचा शाल,श्रीफळ देऊन मा. श्री.अशोक अवसरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मराठी नेट परिक्षेमध्ये देशात १४वा क्रमांक आल्याबद्दल साने गुरूजी वाचन मंदिर च्या आजीव वाचक सौ.ज्योती तोरसकर यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे. प्रास्ताविक श्री. अशोक अवसरे यांनी केले. कु. अदिती कुडाळकर यांनी भाषा प्रतिज्ञा सांगितली.संजयकुमार रोगे यांनी आभार मानले . कार्यक्रमाला संस्थेचे कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर, श्री. रविंद्र वराडकर, वैष्णवी आचरेकर,पंढरी सावंत, सोनाली कोळंबकर आणि मालवण मधील रसिक श्रोते ,सेवांगण परिवार उपस्थित होते.सौ.सोनाली कांबळी यांनी कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली. ऋतुजा केळकर यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाची सांगता रुजारिओ पिंटो यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन केक कापून चहापानाने करण्यात आली.