चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे आज दिनांक २५ व २६ फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विविध उद्योजकता विकास कार्यक्रमांची सुरुवात सकाळी १० वाजता कुडाळपासून होईल. सकाळी १० वाजता कुडाळ बस स्थानक मैदानावर भरवल्या जाणाऱ्या “कॉयर प्रदर्शना”चे उद्धाटन एमएसएमईचे मंत्री मा. नारायणराव राणे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर १०:३० वाजता कुडाळ एमआयडीसी येथील कॉनबॅक स्फूर्ती बांबू क्लस्टरचे उद्धाटन करून मा.राणेसाहेब ओरोस शरद भवन येथे मुख्य कार्यक्रमाला रवाना होतील.
सकाळी ११ वाजता सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे शरद कृषी भवनमध्ये “एमएसएमई उद्योजकता विकास कार्यक्रमा”चा उद्धाटन सोहळा राणेसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण, प्रशिक्षितांना मधमाशांच्या पेट्या, कुंभारचाके, अगरबत्ती मशीन यांचे वाटप, शेतकऱ्यांना बांबू रोपांचे वाटप केले जाणार आहे.
दुपारी १२:०० ते १:०० या वेळात एमएसएमई योजना आणि ईडीपी कार्यक्रमाच्या माहीतीचे सादरीकरण होईल. दुपारी ०१:०० ते ०२:०० रूपे कार्ड लॉन्च करणे आणि एमएसएमई उद्योजकांना रूपे कार्डच्या पहिल्या बॅचचे वितरण असा कार्यक्रम होईल.
दुपारी ०३:००ते ०४:०० या वेळात कॉयर बोर्डासंबंधीच्या योजनांच्या माहितीचे सादरीकरण एफएफडीसी कनौजद्वारे सादरीकरण, मशरूम लागवडीचे सादरीकरण करण्यात येईल.
दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक २६ फेब्रुवारीला सकाळी १०.१५ ते १०.३० या वेळेत कणकवलीत प्रहार भवन येथे कॉयर बोर्डाच्या प्रादेशिक कार्यालयाचे ना. राणेसाहेबांच्या हस्ते उदघाटन होईल. त्यांनतर १०:३० ते ०३:०० वाजेपर्यंत कणकवली प्रहार भवन येथे अनुसूचित जाती/जमाती उद्योजकांसाठी विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वंचित समाजाच्या उद्योजकांना एमएसएमईच्या योजनांचा फायदा व्हावा आणि खऱ्या अर्थाने आर्थिक समृद्धी सर्वसामान्य समाजात रुजावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित समाजाच्या (SC, ST) उद्योजकांचा विकास कार्यक्रम व केंद्रीय लघु सूक्ष्म उद्योग खात्यातील वेगवेगळ्या उद्योग विषयातील योजना यांचे मार्गदर्शन या मेळाव्यात होईल.
या मार्गदर्शन मेळाव्याला मा.नारायणराव राणे,
केंद्रीय कॅबिनेट मंत्री व मा.मिलिंद कांबळे,राष्ट्रीय अध्यक्ष, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज हे उपस्थित रहाणार आहेत. नाविन्यपूर्ण उद्योगांची ओळख, कॉयर बोर्ड (नारळाच्या काथ्यापासून बनवलेल्या विविध वस्तू) प्रदर्शन, वंचित समाजाला उद्योगांसाठी मार्गदर्शन स्टॉल, आधार उद्योग नोंदणी मार्गदर्शन, वंचित समाजातील उद्योजकांनी उत्पादित केलेला माल शासन खरेदी करण्यासाठीचे मार्गदर्शन, शासकीय ठेक्यामध्ये ३०% आरक्षणाबाबत माहिती,उद्योगाला अर्थपुरवठा व सबसिडी यांची माहिती या अनुषंगाने यावेळी मार्गदर्शन करण्यात येईल.
या एमएसएमई उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार, यांच्यासह, नॅशनल स्मॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशन, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग यांचा सहभाग असणार आहे. उद्योजक, ठेकेदार, सेवा देणारे उद्योजक, नवीन उद्योग सुरु करणारे नवउद्योजक, कारागीर यांनी सहभाग दाखवत आपल्या आर्थिक प्रगतीची दिशा ठरवावी अशा उद्देशाने हे विकास उपक्रम राबविले जात आहेत.