सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांची मागणी.
चिंदर |विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही पतसंस्थांची आर्थिक स्थिती ही अत्यंत हलाखीची असून, या पतसंस्थांच्या कर्ज थकबाकी वसुली करता जिल्हा बँकेच्या माध्यमातून वाहनाची व्यवस्था व वसुली अधिकारी द्या अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे पतसंस्था मतदारसंघातून निवडून आलेले संचालक सुशांत नाईक यांनी जिल्हा बँक अध्यक्ष यांच्याकडे केली आहे. आर्थिक अडचणीत आलेल्या पतसंस्थांची स्थिती सुधारण्याकरिता त्यांच्या कर्जाची थकबाकी वसूल होणे गरजेचे आहे. या करिता पतसंस्थांना वाहन किंवा वसुली अधिकारी नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून जर या पतसंस्थांना एक वाहनाची व्यवस्था व सोबत जिल्हा बँकेचा वसुली अधिकारी दिल्यास पतसंस्थांच्या थकबाकीची वसुली होऊन या आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेल्या पतसंस्था उर्जितावस्थेत येऊ शकतात असे श्री नाईक यांनी म्हटले आहे. अशी मागणी देखील जिल्हा बँकेच्या बैठकीत केली. त्याला संचालकांनी पाठिंबा दिल्याचे श्री नाईक यांनी सांगितले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या पतसंस्था ना थकबाकी वसुली करिता वसुली अधिकारी व वाहनाची व्यवस्था आवश्यक आहे अशा पतसंस्थानी लेखी स्वरूपात अशी मागणी माझ्याकडे करावी यासंदर्भात जिल्हा बँकेकडे पाठपुरावा करण्यात येईल असे श्री नाईक यांनी म्हटले.