सिनेपट.
18 फेब्रुवारीला एमेझाॅन प्राईमवर बहुचर्चित ‘बेस्ट सेलर’ या वेब सिरिजचा पहिला सीज़न प्रदर्शित झाला.
द ग्रॅंडमास्टर मिथुन चक्रवर्ती यांचा या सिरिजच्या टीज़रमधील वावर या वेबसिरीजबद्दल आकर्षक वातावरण निर्मिती करुन गेला होताच शिवाय सोबत वेबसिरीजची हुकुमाची राणी गौह़र ख़ानचाही काॅर्पोरेट लूकमधील अभिनय सर्वांनाच पहायला हवाहवासा झालेला होता.
मुकूल अभ्यंकर दिग्दर्शित या वेब सिरिजच्या पहिल्या सीज़नला मिळालेली कथा निश्चितच एक दर्जा दाखवू शकणारी होती परंतु त्याला सहज अंदाज बांधू शकता येत जाणारी पटकथा आणि संवादांतील चैतन्याच्या अभावाची किनार लागल्याने कथेतील रोमांच पटकथा सरकवून अंगावर आणू शकत नाही.
“रांड,सांड,सीढ़ी,सन्यासी …इनसे बचे तो सेवे कासी…” या बनारसी म्हणीला सोबत घेत घेत पटकथा सुरु होते.
ताहिर वझीर म्हणजे अर्जान बावेजा हा एक प्रतिथयश लेखक जो जवळपास एकाच पुस्तकाच्या असंख्य आवृत्यांच्या कमाईवर दहा वर्षे चैनीचे जीवन जगत आलेला असतो.
अगदी ‘अस्सल कथा’ लिहीलेला लेखक अशी त्याची ख्याती असतानाच त्याला त्याच्या सोशल मिडिया हॅन्डलवर अनेक संदिग्ध आणि धमकीचे संदेश येऊ लागतात.
त्याच दरम्यान त्याच्या जीवनात मितू माथूर म्हणजे श्रृती हसन येते. मितू ही ताहीरची बेभान होऊन गेलेली चाहती तर असतेच शिवाय तिच्याकडे तिची अशी एक स्वतःची कहाणी असते जी ताहीरच्या ‘रांड सांड सीढी सन्यासी’ या पहिल्या पुस्तकाची सिक्वेल ठरावी इतकी प्रभावी आहे याची ताहीरला खात्री होते.
मग खेळ सुरु होतो तो त्या सोशल मिडियावरुन धमकीवजा संदेशांचा,ताहीरचा आणि मितूच्या जीवाचा.
या सर्वात गौहर ख़ान म्हणजे मयांका ही ताहिरची पत्नी तिच्या जाहीरात विश्वातील सर्वोच्च मुक्कामावर असूनदेखील तिचे जीवन एका दिलगिरीत जगत असते.
भरपूर मेहनत करुन नांव कायम करणारी मयांका आणि एकाच पुस्तकाची कमाई वर्षोनुवर्षे खात जगणारा ताहीर यांचे वैवाहीक जीवन हाही एक जटिल परंतु वरवर ऐषोरामी प्रसन्न वाटणारा विषय असतो.
दरम्यान मितू ही लेखक ताहीरच्या खूप जवळ येत चाललेली असते. मयांकाला तिचा त्रास वाटत नाही परंतु तिचे ताहिरसोबत असण्याने ताहीरला कोणता त्रास होऊ नये ही तिची पत्नीसुलभ कळकळ असते.
काही दिवसांनी मितूवर जीवघेण्या हल्ल्यांचे सत्र सुरु होते.
या हल्ल्यांच्या संपूर्ण चौकशी व तपासणीसाठी सि.आय.डी. इन्स्पेक्टर लोकेश प्रामाणिक म्हणजे मिथुन चक्रवर्ती यांची नियुक्ती होते. सि.आय.डी. इन्स्पेक्टरचे कुठलेच गुण नसलेले व अतिशय खादाड खाऊ व्यक्तिमत्व असलेला लोकेश प्रामाणिक त्याची सायबर सेल सहकारी उर्मिला रानडे म्हणजे सोनाली कुलकर्णी (अप्सरा आली वाली) हिच्या सहाय्याने हसत खेळत मितूवरील हल्ल्याची तपासणी व चौकशी सुरु करतो.
याच दरम्यान मयांकाचा जाहिरात क्षेत्रातील भागिदार संजय याचा संशयास्पद मृत्यू होतो आणि तिथून इन्स्पेक्टर लोकेश प्रामाणिक कथेतील खर्या थरारात येतो.
यानंतर किंवा याआधी व दरम्यान काय होते….मितूवर ते हल्ले कोण करतो….मयांका ताहिरसोबत नेहमी दिलगीर का असते आणि ‘रांड सांड सीढ़ी सन्यासी’ या पुस्तकाच्या सिक्वेलचे काय होते हे पहाण्यासाठी ही वेबसिरीज आपण पाहू शकता.
उत्तम तांत्रिक मदत असून थोडे विस्कळीत दिग्दर्शन आणि संवादांतील अचूक आर्ततेचा अभाव यामुळे हा सिझन अर्धाकच्चा म्हणता येईल.
मिथुन चक्रवर्तींचा इन्स्पेक्टर लोकेश प्रामाणिक हा थोडा हटके जरुर आहे परंतु तो तितकाच प्रेडिक्टेबलही असल्याने कथेची पुढची अनेक वळणे एकाच सीनमधून पहाता येतात.
अर्जान बावेजाचा ताहीर हा अगदी उत्तम वठवला गेलाय. त्याच्या कोणत्याही मागील व पुढील कृतीचा अंदाज प्रेक्षक बांधू शकत नाहीत असाच अभिनय आहे.
श्रृती हसनने ओढून ताणून केलेला मितू बनायचा अट्टाहास कीव आणतो परंतु तिच्या चेहर्याच्या वावरातील काही व्हेरीएशन्स तिने कॅमेर्याला उत्तम दिल्यात.
बॅकग्राऊंड स्कोअर फारसा त्रास न देणारा असल्याचा फायदा संवाद लेखकाला करुन घेता आला नाही ही खरेच या वेबसिरीजची खंत म्हणावी लागेल.
यामधील सत्यजीत दुबेने रंगवलेला पार्थ आचार्य हे पात्र संपूर्ण पटकथा चालवायची जबाबदारी घेऊन उतरते ते बघणे थोडे रंजक जरुर आहे…खरेतर कथेचा दर्जा पहाता ते रोमांचक हवे होते पण रंजक राहिले.
वेबसिरीजच्या या सीझनला थोडासा फ्लॅशबॅकचा स्पर्श हा खरेच छानपैकी मूळ कथेत मिश्रीत करण्यात पटकथा लेखक यशस्वी होता होता राहीलाय.
एकंदर 13 वर्षांवरील सर्वांनी एकदा जरुर या सीझनचा आस्वाद घ्यायला हरकत नाही.
बेस्ट सेलरच्या या सिजनसाठी आपण देतोय…. ⭐⭐
सुयोग पंडित. ( सिनेपट क्लबमास्टर )