शिरगांव | संतोष साळसकर : महाराष्ट्र शासनाच्या देवगड कृषी विभागांतर्गत चांदा ते बांदा योजनेंतर्गत “श्री”पद्धतीने भात पीक लागवडी प्रात्यक्षिकासाठी साळशी येथील ९ शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ६८०० रु. घेऊन ती अनुदानापोटी त्यांच्या खात्यात ६३०० रु.जमा होईल असे तालुका कृषी विभागाकडून सांगण्यात आले. मात्र गेली २ वर्षे उलटूनही त्यांच्या खात्यात अजूनही जमा झाली नाही.या कोरोना काळात उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याने ही रक्कम त्वरित नाही मिळाली तर आपण येत्या १५ ऑगस्ट ला साळशी ग्रामपंचायत येथे उपोषणाला बसण्याचा या लाभार्थ्यनी निर्धार केला असून तसे तालुका कृषी विभागाला लेखी निवेदन देण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत साळशी येथील प्रकाश वसंत कुळकर्णी, गणपत जिवाजी नाईक,शांताराम पांडुरंग मिराशी,गुलाब बाळकृष्ण तोरस्कर,विजय विष्णू मिराशी,योगेश जगन्नाथ मिराशी,किशोर धोंडू नाईक,सुनीता सुनील गावकर,तुकाराम सखाराम पारकर आदि ९ लाभार्थ्यांना स्प्रे पपं,कोळपणी यंत्र,५०किलो खत वाटपासाठी लाभार्थ्यकडून ६८०० रु घेण्यात आले.हे सर्व पैसे अनुदान म्हणून खात्यात जमा होतील असे सांगण्यात आले मात्र हे अनुदान म्हणून त्यांच्या खात्यात अद्याप जमा झाले नाही.त्यामुळे या लाभार्थ्यनी २६ जाने रोजी उपोषणाला बसण्याचा निश्चय केला मात्र त्यावेळी संबंधित विभागाकडून आश्वासन देण्यात आले.मात्र या आश्वासनाची अद्याप पूर्तता झाली नाही.याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांनीही वेळोवेळी उपविभागीय कृषी अधिकारी यांना लेखी कळउनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.सध्याच्या कोरोनाकाळात या शेतकरी लाभार्थ्यांना पैशाची गरज आहे.त्यांच्यावर खऱ्या अर्थाने उपासमारीची वेळ आली आहे.याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होऊन आम्हाला आमची रक्कम त्वरित मिळावी अन्यथा आम्ही सर्वजण १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी साळशी ग्रामपंचायत येथे उपोषणाला बसणार असा इशारा देण्यात आला आहे.