QR कोड स्कॅन करून करता येणार रजिस्ट्रेशन …!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीच्या ‘कनक रायडर्स सायकल क्लबच्या वतीने’ सिंधुदुर्ग जिल्हा सायकल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली शहीद दिनाचे औचित्य साधून २७ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘ स्वच्छ सिंधुदुर्ग आणि हरित सिंधुदुर्ग , सायकल राईड सर्वांसाठी , सर्वांच्या आरोग्यासाठी ‘ ही टॅगलाईन ठेवून ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२२’ या सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कनक रायडर्स सायकल क्लबच्या वतीने देण्यात आली.
सायकलिंग विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवावे या दृष्टीने विद्यार्थ्यांना सर्वांगसुंदर बनवून निसर्ग व मानवी मूल्यांची आजन्म जपणूक करण्याचा ध्यास घेऊन कनक रायडर्स ही भव्य सायकल मॅरेथॉन घेत आहे .
गेल्या तीन वर्षामध्ये प्रतिदिन ५ किलोमीटर पासून सुरु केलेला प्रवास ४०० किलोमीटर पर्यंत नेताना कनक रायडर्सचे अनेक सदस्य दिसत आहेत . २५ किलोमीटर , ५० किलोमीटर व १०० किलोमीटर अशी मॅरेथॉन असेल . त्यामध्ये यजमान सिंधुदुर्गासह गोवा , कर्नाटक , औरंगाबाद , पुणे , कोल्हापूर , मुंबई येथील सायकल पटू सहभागी होणार आहेत . यात सहभागी होणाऱ्यांना मेडल्स , सर्टिफिकेट्स व टी – शर्ट दिली जाणार आहेत . या स्पर्धेमध्ये २५ किलोमीटर गटात स्पर्धकांना कणकवली ते कनेडी असा परतीचा , ५० किलोमीटर गटाकरिता कणकवली कनेडी मार्गे फोंडा असा परतीचा , तर १०० किलोमीटर गटाकरिता कणकवली कनेडी मार्गे फोंडा नांदगाव तळेरे साळिस्ते व परतीचा असा मार्ग असेल . स्पर्धेसाठी २५ किलोमीटर दोन तास,५० किलोमीटर चार तास व १०० किलोमीटरकरिता सात तास असा वेळ निश्चित केला आहे . स्पर्धेच्या मार्गावर क्लब तर्फे सपोर्ट व्हेईकल , अॅम्बुलन्स , सोबत तज्ञ सायकलस्वार अशा सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी ठेवली आहे . यात क्रमांकांना फारसे महत्त्व नसून रॅली पूर्ण करण्यावर जास्त भर देण्यात येणार आहे . ज्या स्पर्धकांना या रॅली मध्ये सहभाग घ्यावयाचा असेल त्यांच्यासाठी क्लब तर्फे मोबाईल क्रमांक 9422633721 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .