कवयित्री दिशा पिंकी शेख यांना जाहीर झालाय पुरस्कार.
सुप्रसिद्ध लेखक तथा ‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानचा पहिला राज्यस्तरीय सरस्वती लक्ष्मण पवार काव्य पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख यांना जाहीर झालेला असून मंगळवार दि. 1 मार्च, 2022 रोजी कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे सायंकाळी 4.30 वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ लेखक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. रोख रक्कम 10,000 रु. आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
तृतीयपंथी म्हणून हिणवून गणल्या गेलेल्या आणि एकूणच समाजव्यवस्थेने नेहमीच अमानवीय वागणूक दिलेल्या माणुस असलेल्या हिजडा समूहाचे दुःख आणि वेदना मांडणारी दिशा पिंकी शेख यांची कविता आपल्या भवतालाचा एक क्रूर चेहरा आपल्याला दाखवते. या तळाशी फेकल्या गेलेल्या वर्गाला सर्वसामान्यांशी जोडून घेणारा दिशा पिंकी शेख यांचा ‘कुरूप’ हा काव्यसंग्रह या सन्मानाला सर्वार्थाने योग्य आहे.
सदर पुरस्कार सोहळ्यासाठी ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांना प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित केले आहे.
तसेच सिंधुदुर्ग येथील ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी आणि समाजसेवक संदीप परब, प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. शमिता बिरमोळे यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व साहित्य रसिकांनी या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या सचिव शुभांगी पवार यांनी केले आहे.
अभिनंदन.