वाढदिवस विशेष.
मालवण | सुयोग पंडित : नव्वदीचे दशक संपले आणि एका अनामिक कृत्रिमतेने जगातील बहुतांश लोकांवर राज्य करायला सुरुवात केली.
भारतीय उपखंडात ती कृत्रिमता थोडी जास्त फोफावली कारण त्यातील विविधता हेच त्या गोष्टीचे आकर्षण होते.
त्या कृत्रिमतेतील एक घटक होता ‘प्लास्टिक….!’
नव्वदचे दशक संपताच प्लास्टीकचा केला गेलेला वापर हा न भुतो न भविष्यतीच म्हणावा लागेल.
सकाळच्या दुधाच्या पिशवीपासून सुरु होणारी ही प्लास्टिकगिरी अगदी रात्री झोपेपर्यंतच्या प्लास्टीकच्या मच्छरदाणीपर्यंत पोहोचलेली.
तीस वर्षे उलटल्यानंतर सामान्य माणसाला प्लास्टीक किती घातक आहे याचा अंदाज येऊ लागला आणि आज प्लास्टीकच्या वापरावर मर्यादा आल्यात किंवा त्यावर पुनर्प्रक्रियाही करण्याच्या यंत्रणा लोकांपर्यंत पोहोचू लागल्यायत.
पण या तीस वर्षात माणसाने खूप काही गमावले….किंवा एका वाढणार्या पिढीने खूप काही गमावले असेच म्हणता येईल.
तंत्रज्ञानाच्या सुरवातीच्या युगात आयते ,तयार तथा रेडीमेड प्रकार बाजारात उपलब्ध होत असल्याने मुलांना एखाद्या गोष्टीची नैसर्गिक प्रक्रियाच समजत नव्हती. एम्युजमेंट पार्क आणि व्हिडिओ गेम्सच्या गर्दीत शेत,डोंगर,झाडे,फुले,फळं,नदी,ओढे,माती यांच्याकडे वळून पृथ्वी समजून घ्यायचा बालपणाचा काळ या तीस वर्षात जन्मलेल्या व वाढलेल्या बहुतांश पिढीसाठी फक्त ऐकीव गोष्टीत होता.
मातीत , चिखलात लोळून खेळ खेळणं वगैरे गावठी समजले जात होते आणि सोबतच आरोग्य जपण्याचा चुकीचा बागुलबुवा मनावर राज्य करु लागला होता.
रासायनिक खतांचा बेसुमार वापर होऊन आधीच निकृष्ट झालेले अन्नधान्य ,भाज्या, फळं वगैरे ‘फ्रोझन’ करुन पॅक करुन नाहीतर न्यूडल्सच्या माध्यमातून घरोघरी खाऊच्या डब्यातील पौष्टीक पदार्थांची जागा घेत होते.
चिमण्या दातांना आंबट चिंचा बोरांमधून मिळणारी जीवनसत्वे मिळत नव्हती आणि शारिरीक लवचिकतेसाठी झाडापेडांवर चढणे,नदी ओढ्यांत डुंबणे आणि डोंगर चढून दमून भागून येऊन ” आई…भूक…..”, म्हणणारे चिमुकले आवाजही कमी होऊ लागले. शाळेतही मैत्रीच्या निवडीमध्ये प्रचंड चोखंदळपणा आणि सावधगिरी येऊन सामाजिक मुक्ततेचा पहिलाच अध्याय जीवग्रंथांतून वगळला जाऊ लागला.
या सर्वाला तंत्रज्ञान,प्लास्टिक आणि तत्कालीन पालकवर्ग नक्कीच कारणीभूत ठरला…जाणुन बुजून नाही तर पाल्याच्या अतीसावध काळजीने त्याला तयार गोष्टी उपलब्ध करुन देणे आणि वर्षातून एकदा कुठेतरी हिलस्टेशनला नेऊन डोंगराच्या वरुन खालची शेती दाखवणे म्हणजे निसर्गाशी जवळीक असे वाटू लागलेला तो काळ म्हणता येईल.
तीस वर्षे…..दोन तपांपेक्षा मोठा कालावधी.
पण अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अर्णव चंद्रकांत गोलतकर या मुलासारखे श्रीमंत बालपणही जगायची काहीशी सुरवात पुन्हा होऊ लागल्याची उदाहरणे दिसतात तेंव्हा जगावर पुन्हा शाश्वत जीवन पद्धती आणि नैसर्गिक प्रक्रियेचे राज्य येणार अशी खात्री पटते.
पळसंब या निसर्गरम्य गावातील सात वर्षांचा अर्णव रानावनात बिनधास्त खेळत मोठा झालाय. चिखलाने माखत खेळत फोटो काढून पुन्हा चिखलात खेळायचे स्वातंत्र्य त्याला आहे. तो शेती करायच्या सर्व प्रक्रिया स्वतःच्या हाताने करतो आणि मध्येच एखाद्या झाडाच्या दणकट फांदीवर चढून मस्त विश्रांती घेतो.
तो गणेश मूर्तीसाठी त्याचे इवलेशे हात मातीत लडबडवतो आणि काटक्यांचा धनुष्यबाण घेऊन खेळातील बालपराक्रमही गाजवतो.
शेणाने सारवलेल्या दुर्मिळ जमिनीवर त्याचे बालपण रांगत मोठे झाल्याने ‘गायीला पान देणे’ ही प्रथा त्याला ग्रंथपोथीतून शिकावी लागलेली नाही हे विशेष.
तो मुक्त आहे…सशक्त आहे आणि महत्वाचे म्हणजे गांवच्या सरपंचाचा मुलगा असून कुठल्याही चुकीच्या फाजील व अतीसावध जीवन पद्धतीत तो वाढत नाही आहे.
घरातील डब्यांना तबला बनवून ताल धरतो ..आणि केशरी सदर्यात वारकरी बनून वारीत टाळ हाती घेऊन फेरही धरतो.
अर्णव चंद्रकांत गोलतकर असा वाढतोय…त्याला कदाचित पालकही कारणीभूत असावेत.
साधे जीवन वगैरे जे वाटते ते किती श्रीमंत कष्टाचे असते ते तो जगणाराच जाणतो….फक्त फरक एवढाच की त्या कष्टांत कुरकुर नसते कारण जमिनीशी घट्ट असलेली पावले नैसर्गिक दमून चेहर्यावर आपसुक प्रसन्नता देतात. ‘तयार जीवनपद्धतीच्या’ मागे मरगळलेले बालपण आता पुन्हा शाश्वतजीवनपद्धतीकडे वळू लागलेय आणि त्याची चुणूक एका छोट्याशा पण निसर्गश्रीमंत गांवच्या मुलाच्या बालपणात दिसते आहे यापेक्षा वेगळा पृथ्वीआनंद तो कोणता असेल…!
असे अर्णव आता शाश्वत जीवनपद्धतीचे धडे अनेकांना देतीलच तेही हिरवेगारपणे….!
आज अर्णवला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. हिरवा गांव बघत मोठा होणार्या अर्णवचा गांव व त्याचे जीवन नेहमीच हिरवेगार राहो याच शुभेच्छा .
सुयोग पंडित .(मुख्य संपादक)