पश्चिम महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे पी.ए.रावराणे…!
वैभववाडी | नवलराज काळे :
कोकणातल्या माणसाला सहकार म्हणजे काय ते कळते ?तो कधी एकत्र येत नाही.सहकार रुजवावा तो पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनीच अस अनेक ठिकाणी बोलतांना आम्ही ऐकत आलो आहे.परंतू 81 वर्षांपूर्वी स्वातंत्रपूर्व काळात कोल्हापूर जिल्ह्यात सहकाराची पाळे मुळे रुजवली ती एका वैभववाडीकर कोकणी माणसाने. त्यांचे नाव आहे रावसाहेब इनामदार उर्फ पांडुरंग अनंत रावराणे उर्फ पी.ए .या देव माणसाने.हे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावतील.
पांडुरंग (रावसाहेब ) अनंत रावराणे उर्फ पी.ए.रावराणे यांचा जन्म २ जानेवारी १९०६ साली वैभववाडी तालुक्यातील नावळे या दुर्गम आणि निसर्ग संपन्न गावात झाला .त्या काळात नावळे गावात शिक्षणाची सोय नव्हती.परंतू प्रतिकूल परिस्थिती असताना शिक्षण घ्यायचे आणि मोठं व्ह्ययचे हे ध्येय रावसाहेबांनी बालपणात उराशी बाळगले आणि लहान थोरांना दिलेला शब्द खरा करून दाखविला.त्यांनी चौथी पर्यंतचे शिक्षण सांगुळवाडी येथील आपल्या मावशीच्या घरी राहून केले .नंतर सातवी पर्यत्तचे शिक्षण सिंधुदुर्गातील पेंडूर (कट्टा )येथे आपल्या बहिणीच्या गावी राहून पूर्ण केले .नंतर मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण घेयाचे झाले तर कोल्हापूर येथे जाण्याशिवाय पर्याय नव्हता.त्या काळात लोक गगनबाबडा येथे पायवाटेने चालत जात असत. नंतर पुढे कोल्हापूर येथे बैलगाडीने प्रवास असायचा.अशा कठीण परिस्थितीत त्यांनी राजाराम हायकूल येथे मॅट्रिक पर्यंत आणि पुढे बी.ए.पर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथे जाऊन पूर्ण केले.कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन ते पुढे मामलेदार (तहसीलदार )झाले.
निस्वार्थी,उत्साही,निर्मळ ,परोपकारीआनंदी ही रावसाहेबांच्या स्वभावाला देवाने जन्मताच दिलेली देणगी होती.ते कितीही मोठे झाले तरी त्यांच्या हाताला लागलेली नावळे गावची लाल माती कधी पुसली गेली नाही.रावसाहेब मामलेदार झाले पण त्यांनी सरकारी नोकर म्हणून आपले काम शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केले.कोल्हापूरात त्या काळात शेतकऱ्यांची परिस्थिती कशी होती ?हे वेगळ सांगायची गरज नाही.रांत्रदिवस शेतात कष्ट करून शेतकरी धान्य,हळद,गूळ,मिरची इत्यादी पिकवत असत हा सर्व माल व्यापारी म्हणेल त्या किमतीला द्यावा लागत असे. त्यामुळे व्यापारी गब्बर झाले.शेतकऱ्यांची पिळवणूक होते हे लक्षात आल्यावर रावसाहेबांनी कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघाची स्थापना केली.फक्त स्थापना केली नाही तर तो संघ बिकट वाट काढीत वाढविला.आणि शेतकऱ्यांना न्याय दिला.विशेष म्हणजे पहिली पाच वर्षे सरकारी नोकर असूनही संघाचे अध्यक्ष म्हणून काम त्यांनी पाहिले. रावसाहेब रावराणे यांनी 1939 साली कोल्हापूर जिल्ह्यात “कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघाची “स्थापना केली.त्या संघाचा आज मोठा वटवृक्ष झाला असून आज या शेतकरी संघाने जागतिक कीर्ती मिळवली आहे.आशिया खंडातील सर्वात मोठा शेतकरी संघ म्हणून प्रसिद्ध आहे .कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघाच्या एकूण 50 शाखा असून त्यातील एक शाखा वैभववाडी तालुक्याच्या बाजारपेठेत आजही आहे.या संघाचा शेतकऱ्याना आजही खूप उपयोग होत असतो.
शिरोळ तालुक्यात ते मामलेदार असताना त्यांना लोक शेतकरी मामलेदार असेही आपुलकीने म्हणत.शाहूवाडी पन्हाळा,भुदरगड,गुहागर आंबेगाव( पुणे )येथे मामलेदार म्हणून काम पाहिले.विकासाची गंगा शेतकऱ्यापर्यंत पोचविण्याचे त्यांनी काम केले.आणि कुठे जातील तेथे शेतकऱ्यांची मने जिंकली.आताच्या तहसिदारानी यांच्यावर लिहिलेला गौरव ग्रंथ आदर्श ठरू शकतो.
रावसाहेबांचा नावळे गावात पुरातन निवासी वाडा होता.त्याचे बांधकाम 1946 झाल्याची नोंद आजही आदळते.नंतर त्यांचे वडील अनंत रावराणे यांनी 1922 साली बाजूला माडीचे घर बांधले.त्याना गावात फौजदार आण्णा म्हणून ओळखत असत .लोक अडीअडचणीला त्यांच्याकडे येत असत त्यावेळी ते गावच्या जनतेच्या समस्या ऐकून घेत आणि मदत करीत.
तसेच रावसाहेबांनी नावळे गावात त्याकाळात गोर गरीब लोकांच्या अंगावर धड कपडाही नसायचा इतकी गरिबी होती.अशा गोरगरीब लोकांच्या पाठीवर मायेचा हात फिरवीत राबसाहेबानी मनापासून प्रेम केले आणि मदत केली.परिसरातील आठ दहा वर्षाची गरजू लहान मुलांना कोल्हापूर येथे नेऊन शिक्षण दिले.तेथे बोर्डिंग मध्ये राहण्याची सोय केली.त्यापैकी संभाजी बाजी रावराणे ,सांगुळवाडी यांच्यासारखी माणसे मोठी झाली आणि मध्यप्रदेश मध्ये उप कलेक्टर झाले .रावसाहेबांनी ज्यांना ज्यांना मदत केली त्यांच्या जीवनाचे सोन झाल.
रावसाहेबांच्या अफाट कार्याची दखल घेऊन प्रसिद्ध लेखक राम राजेशिर्के यांनी त्यांच्यावर चरित्र ग्रंथ लिहिला आहे.रावसाहेब यांचा मृत्यू १ जून १९७९ साली कोल्हापूर येथे झाला.ज्या गावात ते जन्मले त्या नावळे गावच्या लाल मातीवर त्यांचे प्रेम होते.म्हणूनूच त्यांनी मृत्यू पत्र लिहिताना त्यात म्हटले होते,माझ्या मृत्यूनंतर काही अस्थी व राख राहील ती तांब्याच्या भांड्यात घेऊन वैभववाडी तालुक्यातील अरुळे गावी ज्या ठिकाणी वाडवडिलांची दहनभूमी आहे.त्या ठिकाणच्या सुख नदीत सोडावी असे लिहिले होते.रावसाहेबांचे पुत्र प्रि.अमरसिह रावराणे यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली.अमरसिंह रावराणे कोल्हापूर चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष होते.सध्या ते हयात नाहीत.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)