जंगलात संशयास्पदरित्या फिरणार्या त्या इसमांची पटली ओळख…!
वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खांबाळे व आचिर्णे जंगलात संशयास्पदरित्या फिरत असलेल्या त्या इसमांच्या समूहाची अखेर ओळख पटली. वैभववाडी पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने आचिर्णे येथील मोईनवाडीत शनिवारी रात्री त्यांना ताब्यात घतलेे. त्यांना पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आणि त्यांची कसून चौकशी व झाडाझडती घेतली. चौकशीत सदर इसम हे कातकरी समाजातील असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी सकाळी पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडून दिले आहे. या घटनेनंतर गेले तीन दिवस भयभीत झालेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तसेच जिल्ह्यात घडलेल्या चोरीच्या घटनांमध्ये या इसमांचा काहीही संबंध नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
खांबाळे जंगलात आठ ते दहा इसम संशयित रित्या फिरताना अनेकांना दोन दिवसांपूर्वी आढळून आले होते. खांबाळेतील ग्रामस्थांना पाहून ते सदर इसम पळून गेले. दरम्यान पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. मात्र ते आढळून आले नाहीत. त्यामुळे नागरिक भितीच्या छायेखाली वावरत होते. शनिवारी आचिर्णे मोईनवाडी नजीक काही स्कूटर बेवारस स्थितीत आढळून आल्या होत्या. गाड्यांजवळ पोलिसांनी पाळत ठेवत त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या इसमांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता ते सर्व इसम फोंडा येथील कातकरी समाजातील असल्याची माहिती पुढे आली आहे. ते तरुण जंगलात फिरून भटकंती करत आपला उदरनिर्वाह करत असतात. पडलेल्या काजू जमविणे, गावठी औषधे जमा करणे व इतर शिकार करणे या उद्देशाने ते फिरतात. मात्र त्या तरुणांकडे कोणतीही शस्त्र नव्हती, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी कातकरी समाजाचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. कोणीही रात्री-अपरात्री फिरू नये, काही अघटित घटना घडू शकते, तसेच पालघर जिल्ह्यातील घटनाही आपल्या डोळ्यासमोर आहे. अशा सूचना जाधव यांनी दिल्या. त्याचबरोबर कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलीस गस्त रात्रीची वाढविण्यात आली आहे. संशयास्पद स्थितीत कोणाची गाडी अथवा व्यक्ती आढळून आल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे.
तत्पूर्वी आचिर्णे गावातील ग्रामस्थांनी काल संशयित चोरांपासून दक्षता संपूर्ण गावात रात्री गस्त चालू केली असता त्यांच्या एक गटाला ही मंडळी सापडली. त्यांनी तत्काळ दुसऱ्या तीन चार गस्त घालणाऱ्या समूहांना फोन करून बोलावून घेतले व नंतर पोलिसांना बोलावून घेतले आणि त्यांच्या स्वाधीन केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)