मुंबई - मडगांव वंदे भारत एक्सप्रेसला अतिरिक्त ८ कोच जोडणे.
पालकमंत्री नितेश राणे यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : श्री गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई - मडगांव वंदे भारत एक्सप्रेसला (ट्रेन क्रमांक २२२२९) अतिरिक्त ८ कोच जोडण्याची मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गणेश चतुर्थी उत्सवा दरम्यान महाराष्ट्रातील भाविक आणि प्रवासी त्यांच्या मूळ गावी प्रवास करतात. या काळात मोठ्या संख्येने अपेक्षित असलेल्या प्रवासी वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर ट्रेन क्रमांक २२२२९ (वंदे भारत एक्सप्रेस) मध्ये ८ अतिरिक्त कोच वाढवण्याचा विचार करावा. वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी, उत्सवाच्या काळात गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरेल. या उत्सवादरम्यान प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक सूचना लवकरात लवकर देण्यात याव्या, असेही मंत्री नितेश राणे यांनी नमूद केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)