अतिशय सुलभ भाषेतील हे पुस्तक अत्यल्प शुल्कांत ऑनलाईनही मागवता येणार..!
चिंदर | विवेक परब (विशेषवृत्त): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या सिध्दहस्त लेखिका,पत्रकार आणि को.म.सा.प. मालवण शाखेच्या माजी अध्यक्ष वैशाली पंडित यांच्या चौफेर लेखणीतून ‘ श्री गजानन महाराज विजय ग्रंथ’ या संतकवी दासगणू विरचित पोथीचे ‘साहित्यिक पारायण’ आता पुस्तकस्वरुपात प्रकाशीत झाले आहे.
शेगांवीचे श्री गजानन महाराज हे संत समस्त भक्तगणांना पितृस्थानी आहेत.’श्री गजानन विजय ग्रंथ’ ही संतकवी दासगणू विरचित पोथी अनेकांचा पथदीप अशीच आहे.
पण ही पोथी फक्त देवघरापुरती राहू नये तर ती आजच्या ‘मराठी तरूणाने’ डोळसपणे वाचावी असा या साहित्यिक पारायणाचा मूळ हेतू आहे.
मराठी साहित्यातील संतचरित्राचे एक समाजभान असणारे दालन एकदातरी उघडून पहावे यासाठीच हे साहित्यिक पारायण निश्चितच उपयुक्त ठरेल असा या पुस्तक प्रकाशनामागील उद्देश असल्याचे प्रकाशकांनी स्पष्ट केले आहे.
या ग्रंथातील सामाजिकता,चमत्कार , राजकारणाचे पडसाद, स्त्री व्यक्तिरेखा,भारतीय योगविद्या आणि गजानन महाराजांनी दिलेले मूल्यशिक्षण अशा मुद्द्यांचा आजच्या घडीला अनुसरून घेतलेला आढावा या साहित्यिक पारायणात अतिशय सुलभ भाषेत घेतला गेलेला आहे.
आजच्या पिढीला व युवावर्गाला अध्यात्माची ओढ असून त्याची सत्वसामाजिक उकल होणे ही आजची गरज असल्यानेच ह्या साहित्यिक पारायणाची संकल्पना सत्यात आल्याचे लेखिका वैशाली पंडित यांनी दूरध्वनीवरून सांगितले आहे.
गजानन चरित्राचा आजच्या कोरोनायुक्त आणि कोरोनामुक्त काळात कसा आणि काय संबंध पोचतो याचे स्पष्टीकरणही या पुस्तकात वैशाली पंडित यांनी केले आहे.
या पुस्तकासाठी नामवंत शास्त्रज्ञ आणि अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती श्री.ओमप्रकाश कुलकर्णी यांची प्रस्तावना लाभली आहे.
संग्रही ठेवण्यासाठी आणि भेट देण्यासाठीही उपयुक्त असे हे पुस्तक जरुर संग्रही ठेवण्याचे विशेष सात्विक आवाहनही श्री.ओमप्रकाश कुलकर्णी यांनी केले आहे.
लेखिका वैशाली पंडित यांनी यापूर्वी मालवण तालुक्यातील वायंगणी येथील सिद्धपुरुष संत दादा महाराज प्रभू (वायंगणकर) यांच्याविषयीचे ‘कल्याण कटोरा’ हे पुस्तक लिहीले होते आणि त्यालाही संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस सात्विक प्रतिसाद मिळाला होता.
‘अल्टिमेट असोसीएटस् ,नाशिक यांच्या प्रकाशनाद्वारे’ हे साहित्यिक पारायण पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे.
0253-23552530 आणि 9822017091 या क्रमांकावर संपर्क करुन या पुस्तकाच्या खरेदीची चौकशी करता येईल.