बॉम्बे ब्लडग्रुप रक्तदाते सुधीर कांबळी यांनी जोडले दुर्मिळ रक्तगटाने नाते..!
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानची सामाजिक बांधिलकी
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : ‘बाॅम्बेसे आया मेरा दोस्त…”,या गीतातील एक आनंदाचा दिलासा एका वेगळ्या बाॅम्बे घटकाने दिल्याची सामाजिक स्तरावरची घटना नुकतीच घडली आहे. यावेळी तो बाॅम्बे घटक हा कुठल्या शहराचे नांव नसून तो दुर्मिळ असा ‘बाॅम्बे रक्तगट’ आहे हे या घटनेचे वैशिष्ट्य. मालवण तालुक्यातील नांदोस येथील बॉम्बे ब्लड ग्रुपचे सदस्य राजाराम गोविंद गावडे (वय ६५) यांना हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे डायलिसिससाठी अतिदुर्मिळ अशा बॉम्बे ब्लड ग्रुपच्या रक्ताची गरज निर्माण झाली असता सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सदस्य आणि बॉम्बे ब्लडग्रुप रक्तदाते सुधीर कांबळी यांनी मंगळवारी ओरोस रक्तपेढी येथे अतिदुर्मिळ रक्तगटाचे रक्तदान केले.
सुधीर कांबळी यांनी सदर रुग्णासाठी यापुर्वी देखील सप्टेंबर महिन्यात रक्तदान ओरोस येथे केले होते. राजराम गावडे यांना रक्ताच्या पूर्ततेसाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सचिव किशोर नाचणोलकर यांनी प्रयत्न केले.
बॉम्बे ब्लड ग्रुप हा जगाच्या लोकसंख्येत १० लाख लोकांमध्ये फक्त ४ जणांचाच असतो, त्यामुळे तो अत्यंत दुर्मिळ असाच आहे. तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून व रक्तपेढींच्या सहकार्याने या गटाचे तब्बल ४ रक्तदाते मालवण तालुक्यात सापडले आहेत. तसेच मालवणात या चार जणांसह एकूण ७ व्यक्ती या रक्तगटाच्या सापडल्या आहेत. तर जिल्ह्यात बॉम्बे ब्लड ग्रुपच्या एकूण १४ जणांची नोंद झाली आहे. जीवाला जीव देतो तो दोस्त आणि रक्त ही तर जीवाची अत्यावश्यक गरज….! या बाॅम्बे रक्तगटाच्या निमित्ताने ‘बाॅम्बेसे आया मेरा दोस्त’ ह्या ओळींना एक ‘रक्तदाता दोस्त’ असा अर्थही प्राप्त झाल्याने श्री.सुधीर कांबळी यांची विशेष प्रशंसा होत आहे.