मालवण | संपादकीय : ‘हॅटट्रीक’ या शब्दाला ऐकले की संपूर्ण मनातील विचारांचे अदृश्य अणूरेणू कुठेतरी सुखावून जात असतात.
मराठी मनांनीही गेल्या आठवडाभरात एक हॅटट्रीक अनुभवली आहे आणि ती हॅटट्रीक अनुभवताना मनाचा प्रत्येक अदृश्य अणूरेणू मात्र आसवांच्या श्रृंखलमध्ये रुपांतरीत होतोय….तेही दृश्य स्वरुपात.
२ फेब्रुवारीपासून सुरु झालेली ही दुःखद श्रृंखला आज ७ फेब्रुवारीला हॅटट्रीक बनणे ही खरेच महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेला आणि खासकरुन कला तथा सांस्कृतिक क्षेत्रातील रसिकांना नकोशी झालेलीच गोष्ट ठरली आहे.
आधी चतुरस्त्र अभिनेते श्री रमेश देव यांच्या निधनाची वार्ता मराठी मनाला ऐकून धक्का बसला होताच तोवर दिनांक ६ फेब्रुवारी रोजी भारतरत्न लतादिदी मंगेशकर यांचे देहावसान ही बातमी मराठी मनाला अक्षरशः पिळवटून टाकणारी अशीच होती आणि तो दिवस मावळून दिनांक ७ फेब्रुवारी नीटसा उगवलाही नाही तोपर्यंत कोकणचे दशावतारी लोककलावंत व नटसम्राट सुधीर कलिंगण यांनी जगाला निरोप देऊन पुढील प्रयोगासाठी अनंताच्या रस्त्याकडे मार्गाक्रमण करत देह ठेवल्याची वार्ता आली…!
कला क्षेत्रातील तीन सर्वोच्च परिपक्व आणि ठहराव असलेली व्यक्तिमत्वे केवळ पाच दिवसांच्या कालावधीत रसिकांचा राम राम घेत कुठेतरी निघून जायची ही नकोशी साप्ताहीक हॅटट्रीकच म्हणावी लागेल..!
अश्रू सुकतात….काळ फुंकर घालतो अशा अनेक समजुतींना छेद देणारा असाच हा आठवडा…! दिग्गज कलावंतांच्या जाण्याने न भरुन येणारी सांस्कृतिक हानी होते हे खरेच आहे परंतु त्यांच्या असण्याने काळाच्या पुढे जात जात समाज ,रसिक,चाहते यांच्या वाढलेल्या सांस्कृतिक समृद्धीच्या श्रीमंतीचे हिशेब कुठल्याच वहीत मावणारे नसतात याची जाणीव होत होत एकेक कृतज्ञ अश्रू भल्याभल्यांना छोटे मूल बनवून सोडतो.
आता या हॅटट्रीकनंतर अवघ्या महाराष्ट्राला ‘मुंबई’ बनावे लागेल.
इच्छा नसूनही जीवनरहाटीची धकाधक सुरु ठेवताना पुन्हा एक उसने स्फुरण आणावे लागणार आहे….वेळ नाहीय यापेक्षा काळही नकारात्मकतेमध्येच घुटमळतोय म्हणून समस्त मराठी मनांना ‘मुंबई’ बनून स्वतःला जागे ठेवावे लागेल.
कोरोना काळानेही जितकी सलग मानसिक क्षती केली नसेल त्यापेक्षा कितीतरी जलद अशी मनोविदारक अवस्था या आठवड्याने दिली आहे.
तीनही सर्वोच्च व्यक्तिसंस्थांना सद्गती लाभो हीच भावना प्रत्येक मराठी मनाची आहे आणि सोबतच काळाने अशा नकोशा हॅटट्रीकची पुनरावृत्ती करु नये हीच आशेची प्रार्थना मराठी रसिक करत आहेत.
सुयोग पंडित. (मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)