मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा “बापूभाई शिरोडकर स्मृति अष्टावधानी गुरु पुरस्कार” यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कला, साहित्य, शिक्षण या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व, अनेकांचे गुरु, व आचरे गावचे अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री. सुरेश ठाकूर याना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप असून या पुरस्काराचे वितरण १७ जानेवारी रोजी दुपारी ठिक ३ वाजता बॅ नाथ पै सेवांगण, कट्टा येथे करण्यात येणार आहे. श्री.विनोद शिरसाट (संपादक साधना मासिक), श्री. देवदत्त परुळेकर (अध्यक्ष बॅ. नाथ पै सेवांगण मालवण) व इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. नाथ पै सेवांगण कट्टा यांचे वतीने अध्यक्ष श्री. किशोर शिरोडकर, कार्यवाह श्री. शाम पावसकर, कोषाध्यक्ष श्री. अरविंद शंकरदास यांनी सदर पुरस्काराची घोषणा केली. सुरेश ठाकूर यांनी प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख म्हणून काम केले असून आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रम राबवून त्यात विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना घडविले. ख-या अर्थाने अष्टपैलू, अष्टावधानी कामगिरी बजावली. सेवानिवृत्तीनंतर अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा मालवण, को.म.सा.प. शाखा मालवण या संस्थांचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळून साने गुरुजींचे विचार तसेच साहित्यिक चळवळ जोमाने वाढविली. “सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार” त्यांना १९९२ मध्ये प्राप्त झाला होता. महाराष्ट्रात बालनाट्य व कथाकथन तंत्रमंत्र प्रसार-प्रचाराचे कार्य करताना बालनाट्य शिबिरे विविध संस्थाच्या सहकार्याने महाराष्ट्रात विविध ठिकाणी घेतली आहेत. ‘कथाकथन तंत्र आणि मंत्र’ शाळा व महाविद्यालयातून महाराष्ट्रातील शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. साने गुरुजी कथामाला, बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, राष्ट्रसेवा दल – पुणे विभाग यांच्या मार्फत महाराष्ट्रात बालनाट्य शिबिरे आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे आयोजित केली आहेत. “आदर्श कथामाला कार्यकर्ता पुरस्कार २०००”, “आदर्श कथानिवेदक पुरस्कार!”, साहित्यातील योगदानाबद्दल “जयवंत दळवी पुरस्कार” ललित गद्यासाठीचा ‘स्व. सौ. लक्ष्मीबाई आणि राजाभाऊ गवांदे पुरस्कार – २०१६’ असे अनेक पुरस्कार त्यांनी यापूर्वी मिळविले आहेत. ठाकूर सर यांच्या सारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची आमच्या संस्थेतर्फे दिल्या जाणा-या “बापूभाई शिरोडकर स्मृति अष्टावधानी गुरु पुरस्कार” या पुरस्कारासाठी निवड करताना आम्हाला फार आनंद होत आहे,” असे बॅ. नाथ पै सेवांगण कट्टाचे अध्यक्ष श्री किशोर शिरोडकर यांनी म्हटले आहे.