बांदा / राकेश परब : मडूरा बाबरवाडी येथील जितवना भागातील माती नाला बंधाऱ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या बकर्यावर मगरीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी घडली. या हल्ल्यात बकर्याच्या मानेवर गंभीर जखमा झाल्या आहेत. मालक केदू कानू शेळके यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवित मगरीवर दगडांचा वर्षाव केल्याने मगरीच्या तावडीतून बकरा बचावली.
मडूरे गावात मगरीने पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आज केदू शेळके हे बकर्यांच्या कळपाला माती नाला बंधाऱ्यात पाणी पिण्यासाठी घेऊन गेले होते. अचानकपणे दबा धरुन बसलेल्या मगरीने बकर्यावर हल्ला चढविला. यावेळी केदू शेळके यांनी मगरीवर दगडांचा वर्षाव केला व आरडाओरड करताच मगर पाण्यात गेली.
याबाबत मडुरा उपसरपंच विजय वालावलकर यांनी वनविभागा विरोधात संताप व्यक्त केला आहे. मडुरा गावात ठिकठिकाणी मगरींचे वास्तव्य आहे. मगरींचा बंदोबस्त करण्याबाबत वनविभाग चालढकल करीत असल्याचा आरोप विजय वालावलकर यांनी केला आहे.