जेष्ठ नागरिकांना होतोय नाहक त्रास ; रेल्वे प्रशासन मात्र सुशेगात
कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ):कणकवली रेल्वे स्थानकाचे नुतनीकरण झाल्यानंतर त्याठिकाणी प्रवाशांसाठी विशेषतः जेष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त असा स्वयंचलीत जिना उभारण्यात आला होता. स्वयंचलित जिन्याचा शुभारंभ झाल्यानंतर कणकवली तसेच इतर ठिकाणच्या सर्वच प्रवाशांमधून आनंद व्यक्त होत रेल्वे प्रशासनाने आभार मानण्यात आले होते. काही काळ या सुविधेचा रेल्वे प्रवाशांनी लाभ घेतला मात्र कोविडच्या सुरवातीच्या काळात सदर स्वयंचलित जिना तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याचे फलक याठिकाणी लावण्यात आले. त्यानंतर हा जिना पुन्हा सुरू होईल या अपेक्षेत प्रवाशी होते. कोरोना काळात रेल्वे वाहतूक बंद असल्याने या स्वयंचित जिन्याकडे दुर्लक्ष झालेच. कोरोनाच्या निर्बंधात शिथिलता आल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे सेवा सुरू झाली मात्र ते फलक जसेच्या तसे होते. प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत सदर जिना सुरू करावा अशी मागणी केली व जिना सुरू होईल याची प्रतीक्षा करत राहिले. मात्र सुशेगात असलेल्या रेल्वे प्रशासनाने याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्याचे प्रवाशामधून बोलले जात आहे. रेल्वेने प्रवास करताना कणकवली रेल्वे स्थानकावरील जिना चढताना जेष्ठ नागरिक व इतर प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुंबई ला जाणारे चाकरमानी असो अथवा आपल्या मुंबईस्थित नातेवाईकांना भेटवस्तू नेणारे गावाकडील नागरिक असो यांना स्वयंचलित जिना बंद असल्यामुळे हातातील सामान पायी चालत न्यावे लागते यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार लक्ष वेधूनही रेल्वे प्रशासन सुशेगात असल्याने प्रवाशी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. सदर जिना लवकरात लवकर दुरुस्त करून प्रवाशांना होणारा त्रास रेल्वे प्रशासनाने दूर करावा अशी मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे……याच संदर्भात एक विशेष आपली सिंधुनगरी चॅनेलवर श्री अशोक दाभोळकर यांच्या मनोगतातून येत आहे…..
उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ)