मात्र जानेवारी अखेर पर्यंत कामास सुरवात न झाल्यास आमरण उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा
शिरगाव/संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगाव ते साळशी या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याचे सलग पूर्णपणे डांबरीकरण व्हावे यासाठी साळशी ग्रामस्थांनी उपोषण केले असता देवगड सार्वजनिक बांधकाम चे उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ठोस लेखी आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी उपोषण तूर्तास मागे घेतले.यावेळी ग्रामस्थानी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत उपोषण यशस्वी केले. शिरगाव ते साळशी या रस्त्याची खूपच दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर डांबरीकरण व्हावे यासाठी साळशी ग्रामस्थांनी गतवर्षी २६ जाने. ला उपोषण केले होते.त्यावेळी देखील लेखी आश्वासन दिले, मात्र त्याची अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही.त्यामुळे ग्रामस्थांनी आज २५ डिसें.ला उपोषण केले असता देवगड चे उपविभागीय अभियंता श्रीनिवास बासूतकर व कनिष्ठ अभियंता शुभम गायकवाड यांनी प्रत्यक्ष उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. या चर्चेत या रस्त्याच्या नुतनीकरणांच्या कामाचा प्रस्ताव दि.२३/०८/ २०२१ रोजी आपण सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालयात पाठवला असून त्याला मंजुरी मिळताच या कामाची सुरुवात होईल.तसेच द्विवार्षिक देखभाल दुरुस्तीअंतर्गत या रस्त्यावर मंजूर असलेल्या कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्यारंभ आदेश प्राप्त होताच खड्डे भरण्याची कार्यवाही तत्परतेने पूर्ण करण्यात येईल.सध्या आचारसंहिता असल्याने १९जाने. नंतर आचारसंहिता संपल्यानंतर जानेवारी महिन्याच्या अखेर पर्यंत या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू होईल.तसेच सन २०२२-२३ साली देखभाल दुरुस्तीअंतर्गत कामास मंजुरी मिळाल्यानंतर गटार मारणे व आवश्यक कामे करण्याची कार्यवाही निधी उपलब्धतेतून करण्यात येईल असे उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी उपोषणकर्त्याना लेखी आश्वासन दिले. या लेखी आश्वासनानंतर साळशी ग्रामस्थांनी तूर्तास उपोषण मागे घेतले असले तरी आचारसंहिता संपल्यानंतर जानेवारी महिन्याअखेर या कामाची सुरुवात न झाल्यास ग्रामस्थानी आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला.
यावेळी सरपंच वैभव साळसकर,माजी पं. स.सदस्य सुनील गावकर,माजी सरपंच अनिल पोकळे, महेश भटसाळसकर , कैलास गावकर,प्रभाकर साळसकर यांनी अभियंता श्रीनिवास बासूतकर यांच्याशी या रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली.माजी सरपंच अनिल पोकळे यांनी बोलताना सांगितले की साळशी गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून साळशी हे पर्यटनदृष्ट्या विकसनशील गाव असल्याने या गावात येणाऱ्याना रस्त्याची मूलभूत गैरसोय होत असून रस्त्याचे डांबरीकरण होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच वैभव साळसकर,माजी सरपंच अनिल पोकळे,माजी पं. स.सदस्य सुनील गावकर,माजी सरपंच सत्यवान सावंत,महेश भटसाळसकर, कैलास गावकर,माजी सरपंच किशोर साळसकर,ग्रा.प.सदस्य हर्षल(बाबू)साळसकर, डॉ.प्रभाकर शेळके,प्रभाकर साळसकर,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता.देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे,जिल्हा विशेष शाखा ओरोस चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील राणे,पोलीस पाटील सौ.कामिनी नाईक,बिट अधिकारी राजन जाधव,देवगड तालुका समधेक्षक होमगार्ड अधिकारी मंगेश जाधव,दत्ताराम झानझम,सार्व.बांधकाम देवगडचे उपविभागीय अभियंता श्रीनिवास बासुतकर,कनिष्ठ अभियंता शुभम गायकवाड यांनी भेट दिली.